
>> चंद्रशेखर क. दाभोळकर
संस्कृतपासून उगम झालेल्या अनेक भाषांपैकी एक मराठी भाषा आहे. बारा कोसांवरील मराठी बोलीभाषेतील होणारा बदल पाहता प्रांतनिहाय बोलीभाषेत फरक असला तरी लेखी मराठी एकच आहे. लवचिकतेचा गुणधर्म असलेल्या आपल्या मायबोलीवर अशुद्धतेचा तसेच रांगडेपणाचा फारसा फरक पडत नाही. सदैव आपलेपणच तिच्यात जाणवत असते. अगदी हिंदी, इंग्लिशमिश्रित बोलणाऱ्या ते परदेशातून हिंदुस्थानात आलेल्या मुलांच्या बोललेल्या मराठी भाषेतही गोडवा, आपुलकी टिकून राहते.
इंग्रजाळलेल्या वर्तमान तरुणाईला मराठी भाषेचे प्रतिष्ठतपण ज्ञात नाही. इंग्रजी काळाची गरज मानलेल्या युगात मराठीच्या वर्चस्वाला ठेच पोहोचली आहे. पूर्वजांपासून प्राप्त झालेल्या संस्कृतवान महाराष्ट्राची ओळख असलेल्या मराठी भाषेचे संवर्धन करण्याची गरज भासू लागली. मराठी साहित्याची ओळख इतर भाषांच्या तुलनेत काहीशी धूसर राहिली. मराठी भाषा आचार विचारांतून न दिसता फक्त बोलण्यातूनच दिसत आहे. भाषा ही अत्यंत प्रवाही असते. अगदी ‘लीळाचरित्र’ ते ‘ज्ञानेश्वरी’ असा प्रवास बघितला तर मराठी भाषा खूपच बदललेली दिसते. पूर्वीच्या मराठीतील काही अर्थ आजही समजण्यासाठी उपलब्ध असलेल्या शब्दकोशाचा आधार घ्यावा लागतो. प्राकृतिक नियमाप्रमाणे परिवर्तन घडतच असते, हा प्रकृतीचा नियम भाषेलाही लागू होतो. आता ग्लोबलायझेशनमुळे इंग्रजी ही जगावर अधिराज्य गाजवत असल्याने साहजिकच मराठीवर तिचा प्रभाव आहे. त्यामुळे या जमान्यात तरुणाईच्या तोंडी मराठी बोलीत इंग्रजी भाषेचा शिरकाव आपसूकच होतो. अनवधानाने बोलल्या जाणाऱ्या त्यांच्या या धेडगुजरी मराठीत अनेक इंग्रजी शब्दांना मराठीतील पर्यायी शब्द सापडत नाहीत आणि जरी सापडले तरी ते बोलीभाषेत प्रचलित नाहीत.
भाषा हेच संवादाचे माध्यम असल्याने त्यातील अनेक सोपे बदल लगेच समाजमान्य होतात, परंतु असे सोपे बदल स्वीकारताना व्याकरणाला बगल देणे उचित नाही. कुठल्याही प्रकारचा भाषेच्या मूलत्वाला धक्का न लागू देता बोलीभाषेचा आदर करणं तितपंच आवश्यक आहे. आजच्या सुजाण तरुण पिढीने आत्मीयतेने निर्धार करून मराठी भाषा संवर्धनाचे धोरण स्वीकारले पाहिजे. कोणत्याही भाषेचा विकास हा तिच्या इतर भाषांमधील शब्द सामावून घेण्याच्या औदार्यावर अवलंबून असतो. आजची तरुण पिढी यात माहीर आहे. आपली ओळख, आपली मायबोली हा आपला वारसा असतो. त्याची जपणूक करून तितक्याच जबाबदारीने पुढच्या पिढीला देणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. जागतिकीकरणामुळे आज मराठी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली आहे. सातासमुद्राकडे नोकरी, व्यवसायाचा झेंडा मराठी भाषिकांनी रोवला आहे. मराठी भाषेतील साहित्य इतर परदेशी भाषांमध्ये अपेक्षित प्रमाणात भाषांतरित होताना दिसत नाही.
आधुनिकीकरण, स्थलांतर, संपर्क व दळणवळणाची वेगवान साधने, वाढते आदान-प्रदान, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रभाव, इंग्रजीचे वाढते महत्त्व, रोजगाराच्या संधी यांसारख्या घटकांचा परिणाम प्रादेशिक, स्थानिक बोलींवर होताना दिसतो. अर्थात तरुण वर्गावर मराठी भाषा बिघडवल्याचे आणि प्रदूषित केल्याचे आरोप केले जात असले तरी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी युवा पिढीचेच अनेक गट कार्यरत असताना दिसत आहेत. मराठी भाषेच्या सौंदर्यासह तिला पुढील पिढय़ांकडे संक्रमित करणं ही कामगिरी आजच्या तरुणांनी पार पाडल्यास मराठी भाषा निश्चितच चिरंजीव राहील.

























































