हिम्मत असेल तर चोरलेलं धनुष्यबाण घेऊन मैदानात या, बघूया काय होतं; उद्धव ठाकरे यांचं आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

”ज्या ज्या वेळेला हे छातीवर धनुष्यबाण लावतील तेव्हा यांच्या कपाळावर लिहलेलं असेल की तू चोर आहेस. हे चोरलेलं धनुष्यबाण आहे. ‘मी प्रत्येकवेळी यांना आव्हान देतो. ते आजही देतो. तुम्ही आमचं नाव चोरलेलं आहे, आमचं धनुष्यबाण चोरलेलं आहे. तेच आमचं चोरलेलं धनुष्यबाण घेऊन मैदानात या, मी आमची मशाल घेऊन मैदानात येतो. बघू काय होतं ते. ” असे आव्हानआज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मिंधे गटाला दिले आहे. मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. बोलत होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी मिंधे गट आणि भाजपवर तोफ डागली.

‘तुम्ही नाव चोरलंत, धनुष्यबाण चोरलात. पण ठाकरे कसे चोरणार… ठाकरे म्हणजे मी एकटा नाही. हा एक विचार आहे. हा विचार ज्यांनी आत्मसात केला ते सगळे ठाकरे आहेत.

– निवडणूक आयोग बोगस आहे. हा चुनाव आयोग नाही. चुना लावणारा आयोग आहे. आमचा त्यावरचा विश्वास उडाला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने असा निकाल देण्याचा चोंबडेपणा करण्याची गरज नव्हती.

– आजच्या बांडगुळांना वाटतंय तेच वटवृक्ष झालेत. पण त्यांची पाळमुळे छाटली की ते गळून पडतील हे त्यांनी ध्यानात ठेवावं. अन्याय जाळायचा असेल तर मशाल पेटवावी लागेल. मी आव्हान देतो, तुम्ही धनुष्य घेऊन या, मी मशाल घेऊन येतो आणि बघुया लोक कोणासोबत आहेत ते. दूध का दूध, पानी का पानी हे आम्ही करणार आणि तुमचं गोमूत्र कसं आहे हेदेखील आम्ही सांगणार, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले.

शिवसेनेची वीण घट्ट आहे. आपली मूळं रुजली आहेत. त्यामुळे तुम्ही वरचे शेंडे-बुडके उडवा, काहीही फरक पडणार नाही. कुणाला वाटलं असेल की, ही फुलं तोडली म्हणजे झाड मेलं असेल, पण असं अजिबात नाही. काही वेळा बांडगुळं छाटली जातात. कारण ती बांडगुळं छाटावीच लागतात. ती आपोआप गळून पडत असतील तर आम्हाला आनंद आहे.

“अनेकदा बांडगूळ एवढं वाढतं की, बांडगुळाला वाटतं की तो स्वतः वृक्ष झाला आहे. पण झाडासाठी रस शोषणारी जी पाळंमुळं असतात ती जमिनीत खोलवर रुजवावी लागतात. फाद्यांवरची जी बांडगुळाची पाळंमुळं असतात, तो फांदी छाटली की बांडगूळ मरतं. शिवसेना ही वृक्षाप्रमाणे निर्माण झाली आहे. प्रत्येक क्षेत्रातष्ठ प्रत्येक ठिकाणी अन्यायावरती प्रहार करण्यासाठी शिवसेनेच्या शाखा कार्यरत आहेत. याचा मला अभिमान आहे.”

“शिवसैनिकांच्या मनात जे धगधगते विचार आहेत, तीच खरी शिवसेना आहे. शिवसेना म्हणजे केवळ नाव किंवा चिन्ह नाही. केवळ धनुष्यबाण म्हणजे शिवसेना नाही. शिवसेना आपली आहेच. तिला कुणीही चोरू शकत नाही. पण शिवसेनाप्रमुखांनी जे काही पेरलं आहे, ते तुम्ही आमच्यातून कसं काढाल? आमच्या नसा नसात आणि रगा रगात जी शिवसेना भिनली आहे, ती शिवसेना तुम्ही आमच्यातून कसं काढाल, ही शिवसेना कुणीही काढू शकत नाही, अगदी मोगॅम्बोच्या पिढया आल्या तरीही त्यांना शिवसेना संपवणं शक्य नाही.”