करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज, ‘पुरातत्व’ अधिकाऱ्यांकडून पहाटेच मूर्तीची पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूळ मूर्तीची झीज झाल्याचा संवेदनशील प्रकार सोमवारी प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर आज पहाटेच पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांनी मूर्तीची पाहणी करून याबाबत लवकर अहवाल देण्याचे आश्वासन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला दिले आहे.

दरम्यान, श्री अंबाबाई मूर्तीची होणारी झीज आणि त्याकडे होणाऱया शासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणीही होत आहे.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षानुवर्षे अभिषेकामुळे देवीच्या मूळ प्राचीन मूर्तीची झालेली झीज तसेच काही घटनांमुळे झालेली इजा पाहता, करवीरपीठाचे शंकराचार्यांसह विविध धर्म अभ्यासक, मूर्ती अभ्यासकांकडून विधिवत नवीन मूर्तीचा मुद्दा पुढे आला होता. पण त्यावर आजपर्यंत वेळ मारून नेण्याचाच प्रकार झाला. परिणामी पुरातत्व खात्याच्या तज्ञांकडून मूळ मूर्तीवर दोन-तीन वेळा नैसर्गिक वज्रलेप व रासायनिक संवर्धन करण्यात आले. तरीसुद्धा मूर्तीची झीज थांबलेली नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या पंचवीस वर्षांपासून देवीला अभिषेक नाही, तरीसुद्धा मूर्तीची झीज होत असल्याचे देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश सावंत यांनी सांगितले. त्यात सन 2015 मध्ये रासायनिक संवर्धन केल्यानंतर देवीच्या मूळ मूर्तीतील प्रतीकांसह देवीचे वाहन असलेल्या सिंहातही बराच बदल झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. मूळ मूर्तीत झालेली झीज पाहता, रासायनिक संवर्धन प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी केला आहे.

आज पहाटे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे हे सहकाऱयांसह मंदिरात दाखल झाले. या पथकाने देवीच्या मूर्तीची पाहणी केली. यानंतर याबाबत लवकरच अहवाल देण्याचे आश्वासन देऊन ते निघून गेले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी याला दुजोरा दिला आहे.

शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शासनाच्या कोणत्याही प्रक्रिया वा संवर्धनाची केंद्रीय पुरातत्व खात्याच्या संबंधितांचे मार्गदर्शन तसेच धर्मपीठाच्या मार्गदर्शनान्वये देवीच्या श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज त्वरित थांबवावी, असे आवाहन आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले. दरम्यान, श्री अंबाबाई मंदिराच्या विकास अराखडय़ासाठी 80 कोटींची घोषणा करून आठ कोटींची मलमपट्टी करणारे शासन देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत हेळसांड करणार असेल, तर शिवसेनेला आंदोलनाचा पवित्रा घेऊन, आपल्या आईचं रक्षण करण्यासाठी उभे राहावे लागेल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, शशिकांत बीडकर, दत्ता टिपुगडे, गोविंद वाघमारे, कमलाकर जगदाळे, रूपेश रोडे, विनायक केसरकर, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.