देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कसबा पोटनिवडणुकीत आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रचारादरम्यान धर्माचा उल्लेख करत समाजात दुही माजवल्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे ही तक्रार दाखल केली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. 23 फेब्रुवारी रोजी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील केलेल्या भाषणात फडणवीस यांनी हिंदुत्वाचा उल्लेख करून स्पष्टपणे मतदारांना म्हटले की, ‘हिंदुत्वासाठी मतदान करा. कसबा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी आहे. तसेच, त्यांनी श्री पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख करून म्हटले की, कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांनी पुण्येश्वर महादेव मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. निवडणूक प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केल्याचे व त्याद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यावर निवडणूक आयोगानी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली.