अतिक्रमणांमुळे कोंडला कोल्हारच्या बाजारपेठेचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूरची बाजारपेठ जिल्ह्यात नावाजलेली; मात्र, मुख्य रस्त्यावर अन् अनेक दुकानांसमोरील अतिक्रमणांमुळे या बाजारपेठेचा श्वास गुदमरत चालला आहे. वेळीच व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण काढणे गरजेचे आहे; अन्यथा इतर जिल्हा व तालुक्यातील अनेक बाजारपेठांप्रमाणेच कोल्हारची बाजारपेठही ओस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून बाजारपेठेतील अतिक्रमणधारकांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

40 गावांची बाजारपेठ म्हणून कोल्हार भगवतीपूरचा नावलौकिक आहे. येथे सोन्याचे ज्वेलर्स शोरूम, किराणा होलसेलर्स, कपड्यांची मोठमोठी दालने, हॉटेल व्यवसाय, कटलरी व स्टेशनरीचे अगणित दुकाने, हॉटेल व्यावसायिक, भांड्यांचे होलसेलर्स, सुप्रसिद्ध भेळ, टेलर्स, विविध कंपन्यांचे पेट्रोल पंप, बागायती क्षेत्र आणि साडेतीन शक्तिपीठ एकत्रित असणारे तीर्थक्षेत्र सोबत मंदिरांचे गाव म्हणून ख्याती असलेले शहर आहे. मात्र, या गावाला नगर-शिर्डी महामार्गाच्या प्रवेशद्वारापासूनच अतिक्रमण वाढलेले आहे. अनेक व्यावसायिकांनी दहा फूट जागेत असलेले दुकान 40 फुटांवर आणून ठेवले आहे. गावात प्रवेश करताना चारचाकीच काय दुचाकीही पार्क करण्यास जागा उपलब्ध होत नाही. स्व. माधवराव खर्डे पाटील चौक, नगर-मनमाड रस्त्यावरून मुख्य बाजारपेठेत जाणारा रस्ता, कमानी जवळून मंदिराकडे जाणार रस्ता, सोनगावकडे जाणारा रस्ता चहूबाजूंनी अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे.

महामार्गावरील कोल्हारमध्ये, तर पोलीस स्टेशनसुद्धा या अतिक्रमणातून सुटलेले नाही. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या खाद्यपदार्थांच्या व व्यावसायिकांच्या हातगाड्यांनी रस्ताच अरुंद केला आहे. त्यातच तीनचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने गावात येणारे भक्त मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत हैराण होतात, तर खरेदीसाठी आलेले ग्राहक आपला रस्ता बदलत आहेत. त्यामुळे येथील बाजारपेठेत येणारा ग्राहक दुसऱ्या गावात जाऊ शकतो. पर्यायाने येथील व्यवसायावर त्याचा विपरित परिणाम होताना दिसत आहे. जिल्ह्यातील नगर, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी आदी बाजारपेठांत झालेल्या अतिक्रमणांमुळे येथील ग्राहक इतरत्र खरेदी करतो. हेच ग्राहक आपल्याला आर्थिक फायदा मिळवून देऊ शकतात.

व्यावसायिकांनी स्वतः अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. एकाने अतिक्रमण केल्यावर त्याचे अनुकरण इतर व्यावसायिक करीत असल्याने बाजारपेठेत यायला रस्ताच राहत नाही. जिल्ह्यात नावाजलेली बाजारपेठ असा नावलौकिक असताना ती संथ होत आहे. नगर व इतर शहरांत अतिक्रमणांमुळे तेथील व्यवसाय उद्ध्वस्त होत असल्याने त्यांनी शहराबाहेर स्थलांतर केले. ते केवळ अतिक्रमण व वाहनास येण्यासाठी जागा नसल्याने. त्यामुळे ग्राहक इतर जिल्ह्यातील मॉलमध्ये जात आहेत. व्यावसायिक स्वतःच त्यांच्या पायावर धोंडा पाडून घेत आहेत. वेळीच व्यावसायिकांनी अतिक्रमण काढल्यास कोल्हार भगवतीपूरची बाजारपेठ फुलण्यास मदत होऊ शकते.

– ऍड. सुरेंद्र खर्डे, माजी सरपंच, कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत.

बाजारतळावर खूप जागा आहे. मात्र, व्यावसायिक रस्त्यावरच बसतात. त्यांना सांगूनही ते ऐकत नाहीत. त्यामुळे येथून पुढे त्यांच्यावर भगवतीपूर हद्दीत कारवाई करणार. प्रत्येक रस्त्याच्या कडेला हातगाडीवाल्यांचे साम्राज्य असते. मोठे वाहन सोडा दुचाकीलाही रस्ता शिल्लक नसतो. त्यामुळे येथील अनेक छोट्या-मोठ्या गावांमध्ये नव्याने आठवडे बाजार सुरू झाले. त्याचा फटका गावातील बाजाराला बसत आहे. सर्व व्यावसायिकांनी बाजारातच व्यवसाय करणे गरजेचे आहे.

– प्रकाश डी. खर्डे, उपसरपंच, भगवतीपूर ग्रामपंचायत.