
इंदूर कसोटीत टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना 9 गडी राखून जिंकून हिंदुस्थानची विजयी मालिका खंडित केली आहे. हिंदुस्थानच्या या पराभवानंतर अनेक विक्रम समोर येत आहेत. गेल्या 10 वर्षांतील हिंदुस्थानचा घरच्या मैदानावरील हा तिसरा आणि दोन वर्षांतील पहिला पराभव आहे. यासोबतच टीम इंडियाच्या नावावर आणखी एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे. घरच्या मैदानावर सर्वात कमी चेंडूत झालेल्या पराभवाचा हा विक्रम आहे. तब्बल 71 वर्षांनंतर हा सर्वात लाजिरवाणा विक्रम हिंदुस्थानच्या नावावर झाला आहे. इंदूरमध्ये खेळलेला हा कसोटी सामना केवळ 1135 चेंडूत संपला.
71 वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर टीम इंडियाला 1951/52 मध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वात कमी चेंडूत पराभवाला सामोरे जावे लागले होते. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या त्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण 1459 चेंडूंचा सामना केला. त्या सामन्यात टीम इंडियाला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. आता हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात 1135 चेंडूत पराभूत होत एक नवा विक्रम केला आहे.




























































