
मध्य रेल्वेकडून रविवारी (05.03.2023 रोजी) विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर ठाणे-कल्याणदरम्यान 5वी आणि 6वी लाईनच्या कामासाठी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत ब्लॉक असेल.
या काळात 12126 पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत-कल्याण मार्गे प्रवास करेल आणि 10-15 मिनिटे उशीराने गंतव्यस्थानावर पोहोचेल. सर्व अप आणि डाउन मेल एक्सप्रेस अनुक्रमे अप जलद लाईन आणि डाउन जलद लाईनवर वळवण्यात येतील आणि 10 ते 15 मिनिटांच्या विलंबाने गंतव्यस्थानी पोहोचतील. तसेच वसई रोडवरून दिव्यासाठी सकाळी 09.50 वाजता सुटणारी मेमू कोपर येथेच थांबवण्यात येईल. दिवा येथून 11.30 वाजता वसई रोडला जाणारी मेमू कोपर येथून 11.45 वाजता सुटेल.
हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत आणि वाशी/बेलापूर/पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कुर्ला ते पनवेल-वाशी या मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तसेच या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर आणि मुख्य मार्गावर प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.





























































