जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एकच मिशन… जुनी पेन्शन’, ‘जुनी पेन्शन न देणाऱया सरकारचा धिक्कार असो’, ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी अख्खे कोल्हापूर दणाणून सोडत आज शासकीय-निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनी प्रचंड मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आठवडय़ाच्या सुट्टीमुळे भरदुपारी उन्हाच्या तडाख्यातही पेन्शनच्या मागणीसाठी हजारो सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. सरकारने तातडीने मागणी मान्य न केल्यास यापुढे राज्यभर मोर्चे काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय-निमशासकीय कर्मचारी व शिक्षकांचा लढा सुरू आहे. त्यासाठी 14 मार्चपासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी मैदान येथून शहराच्या प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आणि शेकडो कर्मचारी उपस्थित होते.

सतेज पाटील म्हणाले, चार राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही हा निर्णय घ्यावा. जुनी पेन्शन मिळाली तरच माघार घेतली जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक शब्द काढून जुनी पेन्शन लागू करावी. चर्चेला ‘पाच द्या, पाच सोडा’ असे चालणार नसल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. ‘‘एलआयसी ‘अदानी’ला 34 हजार कोटींना दिली, एसबीआयचे पैसे अदानीत गुंतविले, त्यावेळी आकडेवारी आठवली नाही का? बुलेट ट्रेनमधून राज्याला किती पैसे मिळणार, हे सांगितले जात नाही. एअर इंडियाची इमारत खरेदी केली जात आहे. जाहिरातींवर 200 कोटी खर्च करण्यात येत आहेत; पण कर्मचाऱयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे. विधिमंडळात आम्ही मुद्दा उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे सांगून, चर्चेला बोलावणार असल्याचे म्हणत आहेत; पण चर्चेला बोलावू नका. या 17 लाख लोकांच्या प्रश्नांवर भूमिका का घेत नाही?’’ असा सवालही सतेज पाटील यांनी केला.