
चीनने सिक्कीमच्या दुसऱ्या दिशेला असलेल्या डोकलाम भागातून आपलं सैन्य कमी केलं आहे. मागच्या वर्षी जून महिन्यात ही संख्या दुपटीने वाढवली होती. डोकलाम नजीकच्या भागात एक महिनाभर प्रचंड तणाव होता आणि हळूहळू तो कमी होऊ लागला. आता चीनने तेथील अतिरिक्त सैन्य कमी केलं आहे.
सिक्कीम येथील दुसऱ्या भागात चीनने आपल्या दोन संयुक्त सैन्यदलांना तैनात केलं होतं. चीनचं 52 मीडियम कंबाईन्ड आर्म्ड ब्रिगेडचं मुख्यालय चुम्बी व्हॅलीजवळ आहे. चीनचं सैन्य नेहमी तिथे तैनात असतं. पण, चीनने जूनमध्ये इथे 53 लाईट कम्बाईन्ड आर्म्ड ब्रिगेड सैन्यही तैनात केलं होतं. आता हे सैन्य शांतिस्थळ असलेल्या सेथांगमध्ये परत पाठवलं आहे.
हिंदुस्थानी सैन्याच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चीनने जरी आपलं सैन्य कमी केलं असलं तरी हिंदुस्थानी सैन्य दल तितक्याच प्रमाणात तैनात असणार आहे. गेल्या वर्षी चिनी सैन्याने येथील टोरसा नाला पार केला आणि जामफेरी रिजजवळ सरकायचा प्रयत्न केला. अर्थात हिंदुस्थानी सैन्य तयारीत असलेलं पाहून ते परत गेले. 2017मध्ये जेव्हा डोकलाम वाद झाला तेव्हा देखील हिंदुस्थानकडून चीनला टोरसा नाला पार न करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला होता.
जर चिनी सैन्य टोरसा नाला पार करून पुढे गेलं असतं तर हिंदुस्थानसाठी महत्त्वाच्या असलेल्या सिलीगुडी कॉरिडोरला धोका उत्पन्न झाला असता. हिंदुस्थानसाठी सिलिगुडी कॉरिडोर हा युद्धजन्य परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा आहे. याला चिकन नेक देखील म्हटलं जातं. कारण हा अत्यंत छोटा रस्ता आहे. या रस्त्याला हिंदुस्थानचा ईशान्य भाग जोडला जातो.


























































