काँग्रेसच्या काळात वीज पुरवठा खंडित व्हायचा, त्यामुळेच लोकसंख्या वाढली; केंद्रीय मंत्र्याचा अजब तर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटक राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पारा चांगलाच तापला आहे. निवडणूक प्रचारासाठी सर्वच पक्ष आटोकाट प्रयत्न करत असून नेते एकमेकांचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. ”कर्नाटकात आम्ही सत्तेत आल्यास दरमहा 200 युनिट मोफत वीज देऊ.” या काँग्रेसच्या निवडणुकीतील आश्वासनावर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसने आपल्या राजवटीत वीज दिली नाही, परिणामी देशातील लोकसंख्या वाढली, असा अजब दावा प्रल्हाद जोशी यांनी केला.

प्रल्हाद जोशी म्हणाले की, “आता काँग्रेस मोफत वीज देऊ, असे म्हणत आहे. ते मोफत वीज देणार यावर तुमचा विश्वास आहे का? काँग्रेसने आपल्या सरकारमध्ये कधीच वीज दिली नाही. खेड्यापाड्यात वीज नव्हती. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सत्तेत आल्यानंतर आम्ही 24 तास वीज पुरवण्यास सुरुवात केली. काँग्रेसवर सडकून टीका करताना ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात वीज पुरवठा खंडित व्हायचा, त्यामुळेच लोकसंख्या वाढली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जिंकल्यास दरमहा 200 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. काँग्रेसने जानेवारीत ‘प्रजा ध्वनी यात्रे’दरम्यान ही घोषणा केली होती. प्रल्हाद जोशी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस पक्षाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे ते म्हणाले. जवाहरलाल नेहरूंपासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत अनेक भ्रष्ट व्यवहारांमध्ये काँग्रेस पक्षाचा हात आहे.

दरम्यान भाजप आमदाराच्या मुलाला लाचखोरी प्रकरणात अटक केल्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली होती. लोकायुक्तांच्या छाप्यांमुळे राज्य सरकारचे कौतुक करायला हवे, असे प्रल्हाद जोशी म्हणाले होते. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असल्याने छापे टाळता आले असते, पण तसे झाले नाही. जो कोणी चूक करतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे. असे ते म्हणाले.