नगरमध्ये भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची मनधरणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. नगर जिल्ह्यात भाजपने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मनधरणी सुरू केली आहे. त्याचा प्रत्यय आज पाहायला मिळाला. निमित्त होते, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे नगर जिल्ह्यात आले असताना त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या काही इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी भाजपाने सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत जी काही नाराजी होती ती सुद्धा दूर करण्यासाठी त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून एकत्रित बैठका सुरू केल्या आहे.

 

नगर जिल्ह्यामध्ये लोकसभेचे नगर व शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ आहे. शिर्डी हा मतदार संघ राखीव झालेला आहे. त्यामुळे नगर मतदार संघ हा खुल्या मध्ये आहे. या मतदारसंघांमध्ये सध्या भाजपाचे खासदार सुजय विखे हे या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे आता विखे घराण्याने ताक सुद्धा फुंकू न पिण्यास सुरुवात केली आहे.

 

पारनेर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध विकास कामांचे उद्घाटन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. या कार्यक्रमाला नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी व्यतिरिक्त अन्य पक्षातील सुद्धा पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मागील वर्षी लंके यांनी पक्षांने आपल्याला लोकसभेची उमेदवारी दिली तर आपण निवडणूक लढायला तयार आहोत असे वक्तव्य सुद्धा केले होते व तेव्हापासूनच लंके यांचा नगर-दक्षिणेमधून चांगलाच दौरा हा आता सुरू झालेला आहे.

 

विखे यांनी भाजप मधील जे कोणी अंतर्गत नाराजी बोलून दाखवत होते त्यांची सुद्धा समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे विशेष म्हणजे सगळ्यांना एकत्र आणून आपापल्या मतदारसंघांमध्ये काही कामे आहेत का याची विचारणा सुरू केली आहे तर नगर शहरांमध्ये तर जे भाजपचे पूर्वीचे नगरसेवक निवडणुकी मधून पराभूत झाले होते त्यांना सुद्धा कामे सुचवण्यास सांगितलेले आहे एकंदरीत आता स्वपक्षापासूनच तयारी सुरू केली आहे.