
टीम इंडिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाने WTC ची फायनल गाठली आहे. फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाची होणार आहे. 7 ते 11 जून 2023 दरम्यान इंग्लंडमधील ऐतिहासिक असा ओव्हल मैदानावर रंगणार आहे.
अहमदाबाद कसोटीचा निकाल लागण्याआधीच टीम इंडियासाठी मोठी बातमी आली आहे. क्राइस्टचर्च येथे झालेल्या कसोटी लढतीत न्यूझीलंडने श्रीलंकेचा 2 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे श्रीलंका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडला. श्रीलंकेचा पराभव टीम इंडियाच्या पथ्यावर पडला. फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.
India qualify for World Test Championship final following New Zealand’s two-wicket win over Sri Lanka in Christchurch
— Press Trust of India (@PTI_News) March 13, 2023
शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 8 धावांची गरज होती. या षटकात एक विकेटही न्यूझीलंडने गमावली. श्रीलंकेलाही विजयासाठी दोन विकेटची आवश्यकता असल्याने टीम इंडियाची धाकधुक वाढली होती. मात्र अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभवाचे पाणी पाजले आणि टीम इंडियाच्या जिवात जीव आला.
श्रीलंकेने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 286 धावांचे आव्हान ठेवले होते. 70 षटकांमध्ये न्यूझीलंडला हे लक्ष्य गाठायचे होते. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. धावफलकावर 9 धावसंख्या असताना कॉन्वे बाद झाला. त्यानंतर टॉम लेथमही 25 धावा काढून माघारी परतला, पाठोपाठ निकोल्सही 20 धावांवर बाद झाला.
36व्या षटकामध्ये 3 बाद 90 अशी अवस्था झाल्याने न्यूझीलंडच्या हातातून सामना सटकला असे वाटत होते. परंतु मिशेल आणि कर्णधार विलियम्सन यांनी शतकीय भागिदारी करत न्यूझीलंडला विजयपथावर नेले. मिशेलने वन डे स्टाईल फलंदाजी करत 86 चेंडूत 81 धावा केल्या, विलियम्सनने अखेरपर्यंत नाबाद रहात 121 धावांची शतकी खेळी केली.




























































