पंतप्रधान सुशिक्षित असते तर… अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकांचे बिगुल फुंकलं आहे. भोपाळ येथे आम आदमी पार्टीला एक पर्याय असल्याचं म्हणत मध्य प्रदेशच्या जनतेला संधी देण्याचं आवाहन केजरीवाल यांनी केलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणाही साधला.

मंगळवारी त्यांनी मध्य प्रदेशची राजधआनी भोपाळ येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी मनिष सिसोदिया आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचं कौतुक केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनिष सिसोदिया यांना कारागृहात पाठवलं. त्या दिवशी मला वाटलं की पंतप्रधान सुशिक्षित हवे होते. जर देशाचे पंतप्रधान सुशिक्षित असते तर त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत असतं. जर देशाचे पंतप्रधान देशभक्त असते तर ते हा विचार करत नसते की सिसोदिया आम आदमी पार्टीचे आहेत किंवा आणखी कोणत्या पक्षाचे आहेत. त्यांनी सिसोदिया सारख्या व्यक्तिला शिक्षण मंत्री बनवलं असतं आणि त्यांना सांगितलं असतं की तू देशातील 10 लाख शाळांची परिस्थिती सुधार. पण, त्यांनी सिसोदियांना जेलमध्ये टाकलं. त्या दिवशी मला वाटलं की देशाचा पंतप्रधान सुशिक्षित असायला हवा, अशी टीका केजरीवाल यांनी केली.

कोरोना काळात टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यावरूनही केजरीवाल यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान सुशिक्षित नसतील तर त्यांना कुणीही मूर्ख बनवू शकतं. कोणीतरी येऊन तुम्हाला सांगेल की नोटाबंदी करा, भ्रष्टाचार संपेल. आता कमी शिकलेले पंतप्रधान असतील तर त्यांना काही विशेष समजणार नाही. त्यांनी केली नोटाबंदी, संपला का भ्रष्टाचार? कुणीतरी सांगेल की नोटाबंदीमुळे दहशतवाद संपेल. काय झालं? पूर्ण देशाला रांगेत उभं केलं. संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था धुपवली. पण, ना भ्रष्टाचार संपला ना दहशतवाद. कुणी सांगेल की सगळ्यांकडून टाळ्या – थाळ्या वाजवा, कोरोना संपेल. सगळ्या देशाकडून थाळ्या वाजवून घेतल्या. त्यामुळे मला वाटतं की देशाचा पंतप्रधान सुशिक्षित असायला हवा, अशी टीका केजरीवाल यांनी केली.