
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला खुलं आव्हान देतानाच ‘कोणतेही हल्ले करा, कायदेशीर असतील किंवा बेकायदेशीर असतील तरी आम्ही तुमचा प्रत्येक हल्ला परतवून लावू’, अशा कडक शब्दात ठणकावलं.
दिल्लीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना ते संजय राऊत म्हणाले, ‘गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे परिवार असेल, शिवसेना असेल किंवा आमची सगळे त्यांचे सहकारी असू प्रत्येकाच्या बाबतीत खोटे खटले दाखल करणे, खोटे गुन्हे दाखल करणं मग संपत्तीचा विषय असेल किंवा एखादा व्हिडीओ मॉर्फींगचा विषय असेल फक्त शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेना, ठाकरे परिवार यांना लक्ष्य करणं, टार्गेट करणं हा एकमेव हेतूने राज्याचे प्रशासन आणि राजकारण सुरू आहे. पण आजही आम्ही सांगतो, या देशातील न्यायालयामधील न्याय मेला नाही. मग सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल अजूनही लोकांना न्यायाची अपेक्षा आहे आणि ती आशेची किरणं आम्हाला दिसतात’. याबद्दल अधिक बोलताना ‘या सगळ्या प्रकारणामध्ये ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचा जो कट रचला त्याचे सुत्रधार कोण हे सगळं आम्हाला माहित असातानासुद्धा आम्ही अत्यंत संयमाने हे सगळं प्रकरणं हाताळलं, असं संजय राऊत म्हणाले. ‘खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये खोके वाल्यांच्या संपत्तीचा जे खोके वाल्यांचे सरकार आहे. त्यांच्या संपत्तीचा हिशोब मागायला पाहिजे पण ते आमचा हिशोब मागतायत’, असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला. ‘ठिक आहे. तुम्ही आमच्यावर अशाप्रकारे कोणतेही हल्ले करा कायदेशीर असतील किंवा बेकायदेशीर असतील आम्ही तुमचा प्रत्येक हल्ला परतवून लावू’, असंही राऊत यांनी ठणकावलं.
‘आज विविध नेत्यांना नाही फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. या देशामध्ये फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच सरकार पक्षातर्फे टार्गेट केलं जातं, ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून अटक केली जात आहे. महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, तेलंगणा असेल, पश्चिम बंगाल असेल जणू काही सत्ताधारी पक्षाची लोकं रोज दुधाने आंघोळ करतात. सगळं समोर आले आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात सीबीआय आणि ईडी काय कारवाई करत होती? नारायण राणे यांच्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची त्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात काय भूमिका होती हे सगळे पुरावे समोर आले असताना सुद्धा ते फक्त बीजेपीच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले म्हणून त्यांना अभय दिले. आसामचे मुख्यमंत्री, नारायण राणे हे सगळे तुरुंगात जायला हवे होते अशी भूमिका तेव्हा भारतीय जनता पक्षाची होती. पण आज ते त्यांच्या सरकारमध्ये एकतर केंद्रीय मंत्री आहेत किंवा मु्ख्यमंत्री आहेत, असं ते म्हणाले.
‘काल माझ्या सहकारी प्रियांका चतुर्वेदी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन यांसंदर्भातील सविस्तर माहिती समोर आणली आहे. भारतीय जनता पक्षाने ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले पुराव्यासह. त्यांना कसं अभय मिळालं आणि आज ते कसे भाजपच्याबरोबर सत्तेमध्ये सहभागी आहेत. याच्यापेक्षा मोठा पुरावा काय हवा?’, असा सवाल देखील त्यांनी केला.
विरोधी पक्षांवर अत्यंत चुकीच्या पद्धतीने कारवाया सुरू आहेत. दिल्लीमध्ये मनिष सिसोदिया असतील सत्येंद्र जैन असतील, महाराष्ट्रामध्ये मी स्वत: असेन, अनिल देशमुख असतील, नवाब मलिक असतील, हसन मुश्रीफ असतील, अनिल परब असतील किंवा सदानंद परब असतील प्रत्येकावर राजकीय सुडबुद्धीनेच कारवाया सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
‘काल मी भिमा सहकारी साखर कारखान्याचे एक प्रकरण दिलं पुराव्यासह दिलं, त्यावर त्यांचे म्हणणे आहे की, संजय राऊत आरोप करत आहेत म्हणजे तो पुरावा असू शकत नाही. मी पुराव्यासह दिलं आहे. मग तुमचे जे काय किरीट सोमय्यावगैरे जे काही भंपक आरोप करत आहेत ते कोणत्या आधारावर करत आहेत? आणि कोणत्या आधारावर तुम्ही चौकशा करता? मी वारंवार सांगतो की क्राऊड फंडिंग संदर्भात जर साकेत गोखले जेलमध्ये असेल तर त्याच क्राऊंड फंडींग प्रकारात ‘आयएनएस विक्रांत वाचवा’ या नावावर जे मोठ्या प्रमाणात किरीट सोमय्यांनी पैसे गोळा केले त्याला क्लिनचीट कशी मिळते? याचा अर्थ स्पष्ट आहे की, फक्त सरकारला प्रश्न विचारणारे, सरकारचे घोटाळे काढणारे विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य करायचे, टार्गेट करायचे, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करायचे, त्यांना बदनाम करायचे’, अशा शब्दात त्यांनी सुनावले.
मुंबईतील व्हिडीओ प्रकरणाचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला. राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ नावाचा सिनेमा सुरू आहे. दादा कोंडके आज बघायला हवे होते खरंतर. त्यांचा सिनेमा फार गाजला होता ‘मुका घ्या मुका’. तर ‘मुका घ्या मुका’ प्रकरणामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करताय तुम्ही? त्यांचा संबंध काय आहे? हा सत्तेचा गैरवापर आहे. पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा याच्यामध्ये संबंध काय? तुम्ही त्यांना अटक करता. त्यांच्यावर अशी कलम लागतायत की ते सुटणार नाहीत. आम्ही सांगितले का त्यांना जाहीर कार्यक्रमात मुका घ्यायला? मुळात तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी समोर येऊद्यात. मॉर्फिंगचा विषय नंतर येईल. मी तो व्हिडीओ पाहिलेला नाही हेही सांगतो. पण मला असंख्य कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबीयांचे फोन येत आहेत की, आज आमच्या घरावर पोलीस आले, आज आमच्या कार्यालयात पोलीस आले आहेत. हा काय प्रकार सुरू आहे? मुळात तो व्हिडीओ संबंधित आमदाराच्या मुलाने शेअर केला आहे. त्याला अटक केली का? नाही केली. मग कोणाची बदनामी करताय तुम्ही? तुमच्या पक्षातील, तुमच्या गटातील अंतर्गत जर काही भांडणे असतील ती तुम्ही मिटवा, शिवसेनेला लक्ष्य करू नका, असंही त्यांनी सुनावलं. ‘सुर्वे अजून समोर आलेले नाहीत. यायला पाहिजे. जे काही तुमच्याकडून समजतेय. पहिले गुन्हेगार ते आहेत मुका घेणारे. दादा कोंडकेंनी त्यांच्यावर सिनेमाच काढला असता. दादांचा सिनेमा होता ‘मुका घ्या मुका’ पाहा तुम्ही. आता नव्याने हा सिनेमा शिंदे गट सुरू करणार असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही काही करा. तुम्ही मुके घ्या किंवा मिठ्या मारा हा तुमचा प्रश्न आहे. सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही अश्लिल वर्तन करत असाल आणि त्यावर कोणाचा आक्षेप असेल तर पहिला गुन्हा हा असा आक्षेप वर्तन करणाऱ्यावर केला पाहिजे. तुम्ही आमच्या लोकांना अटक करताय, तुम्ही आमच्या लोकांना धमक्या देताय. रात्री अपरात्री तुम्ही आमच्या शिवसैनिकांचे दरवाजे ठोठावताय. तुम्ही त्यांच्या बायकांना आणि पालकांना धमक्या देताय ही काय मोगलाई चालू आहे का? तुम्ही मुके घेतले तुम्ही निस्तरा. आमच्यावरती बोटं दाखवू नकात. मग शाहिस्तखानाची बोटं तुटली हे लक्षात घ्या’, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. करू द्यात. निवडणूक आयोगाचासुद्धा अत्यंत विचित्र निर्णय आला आणि त्यानंतर असं वाटलं या देशातील न्याय संपला. या देशातील घटनात्मक संस्था विकल्या गेल्या तरीही आम्ही सर्वोच्च न्यायालात लढाई लढतोय. आम्हाला आशेचा किरण दिसतोय. या देशाचे सरन्यायाधीश त्यांच्या घटनापीठ आम्हाला न्याय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘आम्ही विरोधी पक्षाचे सर्व खासदार ईडीच्या कार्यावरची मार्च करत जाणार आहोत की, या देशात आणि जगात सगळ्यात मोठा घोटाळा सुरू आहे. तो अदानी कंपन्यांचा. तुम्ही त्यांना कधी बोलावणार? आम्ही आमची तक्रार घेऊन ती दाखल करा हे सांगण्यासाठी ईडी मुख्यालयात जाऊन ईडीच्या संचालकांना भेटणार आहोत’, असं संजय राऊत म्हणाले.
‘पत्रा चाळ होऊ द्यात. सिमेंट चाळ होऊ द्यात, दगडी चाळ होऊ द्या आय डोण्ट केअर. हे खोटारडे लोकं आहेत. भंपक लोकं आहेत. न्यायालयाने माझ्याविषयी जे भाष्य केलं आहे ते फार महत्वाचं आहे’, असं त्यांनी नमूद केलं.
आदित्य ठाकरेंचं कौतुक
फक्त राजकारण नाही तर विविध क्षेत्रावर ठसा उमटवतात अशा शंभर शक्तीशाली युवकांमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांचे नातू जे बाळासाहेब ठाकरे ज्यांचा जगातील शक्तीशाली नेत्यांमध्ये समावेश होता, अशा माननीय शिवसेनाप्रमुखांचे नातू माननीय आमचे शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा समावेश होणं हा या महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव आहे. महाराष्ट्राचा तर आहेच पण मी म्हणतो हा देशाचाही गौरव आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं.
दिल्लीत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ‘काल या देशामध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडल्या त्यामध्ये आपल्या देशातल्या सिनेमाला ऑक्सर मिळाला आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांचा शंभर शक्तीशाली युवा नेतृत्वामध्ये समावेश झाला. गेल्या काही वर्षापासून आदित्य ठाकरे विविध क्षेत्रामध्ये मग ते राजकारण असेल, आर्थिक असेल, समाजक्षेत्र असेल, पर्यावरण असेल, एक मंत्री म्हणून सुद्धा आणि एक राजकीय नेते म्हणून सुद्धा जागतिक पातळीवर जनमानसावर ठसा उमटवताहेत. त्याला दिलेली ही आतंरराष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे. आम्ही सगळे त्या संदर्भात आनंदी आहोत. खूश आहोत. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे, शिवसेनेचे, देशाचे एक राजकीय भविष्य आहे. असे जे मी वारंवार सांगतो त्यावर हा शिक्कामोर्तब आहे.



























































