
पुणे शहरातील हडपसर आणि विमानगर परिसरात खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. येथून पोलिसांनी तब्बल 34 जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. तर, हडपसर येथून 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हडपसरमधील भेकराईनगर परिसरातील शिवशक्ती चौक आणि विमाननगरमधील वाघेश्वर पार्किंग भागात ही कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपासून शहरातील जूगार अड्डे, अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून धडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. यानुसार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान भेकराईनगरमधील शिवशक्ती चौक परिसरात काहीजण जूगार खेळत तसेच खेळवित असल्याबाबतची माहिती पथकाला मिळाली. यानुसार पथकाने सापळा रचून संबंधीत ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी येथून 22 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा 63 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर, विमाननगरमधील वाघेश्वर पार्किंग याठिकाणी केलेल्या कारवाईत 12 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 14 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधीतांवर हडपसर आणि विमाननगर पोलीस ठाण्यात जूगार प्रतिंबधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे, इरफान पठाण, हणमंत कांबळे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, अमित जमदाडे, ओंकार कुंभार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.



























































