
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कॉपीचे आणि पेपरफुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार न थांबल्यास राज्याचे वाटोळे होईल अशी भीती व्यक्त करतानाच हा मुद्दा गांभीर्याने घेऊन सरकारने याविरोधात कडक भूमिका घ्यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
नगर जिह्यातील टाकळी-मानुर येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱया जमावाकडून लाठय़ाकाठय़ा घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली. तो मुद्दा अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. ते परीक्षा केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. 15 मार्च रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जमावाने भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱयांना धमकावून कॉपी पुरवण्यास मुभा देण्याची मागणी केली होती. अधिकाऱयांनी याला नकार देताच जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. दगडफेकही केली. जालन्यातही सेवली येथील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर विद्यार्थ्यांना कॉपी करू द्या अन्यथा तुम्हाला जीवे मारू अशा धमक्या पालकांनी केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांना दिल्या, असे अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.





























































