शवविच्छेदन नाही, शवचिकित्सा; शिवसेनेच्या मागणीला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या रुग्णालयात आता ‘शवविच्छेदन’ नाही, तर ‘शवचिकित्सा’ शब्द वापरला जाणार आहे. शवविच्छेदन शब्दप्रयोगामुळे जनसामान्यांच्या मनात नकारात्मक भावना आणि भीती निर्माण होते. त्यामुळे ‘शवविच्छेदन’ शब्दाऐवजी ‘शवचिकित्सा’ शब्द वापरावा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली होती.

शवविच्छेदन प्रक्रियेत शवाचे परीक्षण किंवा निदान करण्यासंबंधी असून त्याकरिता शवचिकित्सा हा शब्दप्रयोग योग्य आहे. शवाचे विच्छेदन हा शब्दप्रयोग हा जनसामन्यांच्या मनात नकारात्मक व भीती निर्माण करतो. शवाचे विच्छेदन करण्यामागील उद्देश मृत्यूच्या कारणाचा शोध घेणे असतो. यासाठी शवाचे परीक्षण किंवा निदान करण्यासाठी ते फॉरेन्सिक औषध व विषशास्त्र येथे पाठविण्यात येते. यामध्ये शवविच्छेदन शब्दप्रयोगामुळे गैरसमज निर्माण होतात व जनसामान्यांच्या भावना दुखावल्या जातात. काही वेळा मृत क्यक्तीच्या नातेवाईकांकडून शवविच्छेदन करण्यास नकार दिला जातो व त्याचे रूपांतर उद्रेकामध्ये होऊन अनुचित प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी शवविच्छेदन शब्दाऐवजी ‘शवचिकित्सा’ शब्द वापरावा अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती.