
जळगाववरुन निघालेल्या खासगी ट्रॅव्हलच्या बसला नगर-पुणे महामार्गावरील नारायणगाव शिवारात पेट घेतल्याने खळबळ उडाली. हा प्रकार घडला तेव्हा बसमध्ये 30 प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना खाली उतरवल्याने पुढील अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाववरुन शुक्रवारी रात्री प्रवाशी घेऊन लक्झरी बस (क्रमांक MH 29 AW 5455) पुण्याकडे निघाली होती. बसमध्ये एकूण तीस प्रवासी होते. नारायणगाव येथे आल्यावर अचानक गाडीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. प्रसंगाचे गांभिर्य पाहता चालक विलास गुलाब जुमडे यांनी सर्व 30 प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु बस पूर्ण जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी येथील अग्निशमन दल येथे दाखल झाले. तसेच सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले असून त्यांना दुसऱ्या वाहनाने पुण्याकडे रवाना केल्या असल्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी सांगितले.



























































