मुंबईचे ‘स्वच्छता मॉडेल’ गुजरातमध्ये राबवणार, ‘स्वच्छता यात्रे’ने घेतली प्रकल्पांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधून आलेल्या ‘स्वच्छता यात्रा’ प्रतिनिधींना मुंबई महापालिकेचे ‘स्वच्छता मॉडेल’ चांगलेच भावले आहे. या प्रतिनिधींनी पालिकेच्या माध्यमातून मुंबईभरात राबवलेल्या स्वच्छता उपक्रम, कंपोस्ट खत, कचरा विल्हेवाट प्रकल्पांची माहिती घेत याच धर्तीवर आता गुजरातमध्ये काम करणार असे सांगत चक्क मराठी भाषेतून ‘स्वच्छतेची शपथ’ घेतली.

गुजरात शासनाच्या प्रतिनिधींसह स्वच्छता विषयक कार्य करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी मुंबईला भेट देऊन महानगरपालिकेच्या स्वच्छतेच्या कामाची माहिती घेतली. मुंबईतील कामांच्या धर्तीवर गुजरातमध्येदेखील काम उभे करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुंबईतील महिला बचत गटांना सन्मानचिन्ह देऊन मुंबईतील स्वच्छता कामांचा गौरवही केला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन खात्याचे विशेष कार्य अधिकारी आणि महाराष्ट्र स्वच्छता अभियानाचे राज्य समन्वयक सुभाष दळवी, गुजरातचे स्वच्छता अभियान व्यवस्थापक जिग्नेश पटेल, भावना मिश्रा, गुजरात राज्यातून आलेल्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या व बचत गटांचे प्रतिनिधी, महापालिकेच्या शहर अभियान व्यवस्थापक विभा जाधव, सहाय्यक अभियंता पानसकर आणि पालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अशी केली स्वच्छता यात्रा
या यात्रेमध्ये अंधेरी पश्चिम येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, आर/दक्षिण विभाग कांदिवली पश्चिम परिसरातील रगडापाडा, आरे कॉलनी परिसरातील कोंबडपाडा, अंधेरी पूर्व जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जवळच्या ग्रीनफिल्ड रॉक्स एंड येथे भेट देऊन स्वच्छता उपक्रम, कचरा व्यवस्थापनाची माहिती घेतली. ग्रीनफिल्ड रॉक्स एंण्ड येथे तब्बल 412 सदनिका आणि सुमारे दीड हजार रहिवासी असणाऱ्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाते.