
दिल्लीत आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये पोस्टर’वॉर’ वाढत चाललं आहे. आता आम आदमी पार्टीने ‘मोदी हटाओ देश बचाओ’चे पोस्टर्स 11 भाषांमध्ये जारी केले आहेत. आपतर्फे 30 मार्च रोजी देशभरात ‘मोदी हटाओ देश बचाओ’ची पोस्टर्स देशभरात लावण्यात येणार आहेत.
दिल्लीत ‘मोदी हटाओ देश बचाओ’असे पोस्टर लावल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 100 हून अधिक एफआयआर दाखल केले होते आणि 6 लोकांना अटक केली होती. या अंतर्गत 23 मार्च रोजी आम आदमी पार्टीने ‘जंतर मंतर’वर जाहीर सभा घेतली. या सभेत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही उपस्थिती लावली होती.
या जाहीर सभेत पक्षाचे दिल्ली राज्य संयोजक गोपाल राय यांनी घोषणा केली होती की, आम आदमी पार्टी 30 मार्च रोजी देशभरात ‘मोदी हटाओ देश बचाओ’चे पोस्टर लावेल. हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि पंजाबी व्यतिरिक्त, मराठी, गुजराती, तेलुगू, बंगाली, ओरिया, कन्नड आणि मल्याळम भाषेतही पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

























































