
शेकडो स्पर्धकांच्या उपस्थितीने स्फूर्तिदायक झालेल्या ‘स्पार्टन मुंबई श्री’ किताबासाठी नीलेश दगडे, रोहन गुरव, उमेश गुप्ता, सुशांत पवार, सुशांत रांजणकर, दीपक तांबिटकर, नितीन शिगवण, नितांत कोळीसारख्या पीळदार-जोरदार खेळाडूंमध्ये अंतिम पोझयुद्ध रंगणार आहे. पुरुष शरीरसौष्ठवपटूंसह होत असलेल्या पुरुषांच्या फिजिक स्पोर्ट्स प्रकारात 70 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ‘मुंबई श्री’चा फैसला करणारे पोझयुद्ध सायंकाळी 5 वाजल्यापासून शहाजीराजे संकुलात रंगेल.
तब्बल दोन दशकांनी शहाजीराजे क्रीडा संकुलात सुरू झालेल्या प्राथमिक चाचणीच्या निमित्ताने मुंबईचे शरीरसौष्ठव वैभव एकत्र पाहिल्याने उपस्थितांचे अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटले. भव्यदिव्य आयोजनाची झलक देणाऱया ‘मुंबई श्री’ची तयारी आंतरराष्ट्रीय दर्जाचीच होती. स्पार्टन न्यूट्रिशनचे सहकार्य लाभलेल्या ‘मुंबई श्री’ स्पर्धेला खेळाडूंसोबत प्रेक्षकांच्या विक्रमी उपस्थितीने चार चाँद लावल्याची प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तिकर यांनी दिली.
खरी लढत 75 वरील गटात
‘मुंबई श्री’चा खरा हिरा गवसणार आहे तो 75 आणि 80 किलोवरील वजनी गटातून. वरच्या तिन्ही वजनी गटांत नीलेश दगडे, रोहन गुरव, नितांत कोळी, दीपक तांबिटकर, सुशांत रांजणकर, उमेश रांजणकर आणि सुशांत पवार यांच्यापैकी अव्वल कोण येईल याचा अंदाज आज जजेसनाही बांधता आला नाही. मात्र अनेक वर्षे गटातच बाद होत असलेल्या नीलेश दगडेने यावेळी प्रचंड मेहनत घेतल्याचे त्याची तयारी पाहूनच कळत आहे. रोहन गुरव, सुशांत पवार, सुशांत रांजणकरसारखे अनेक खेळाडू दरवर्षी गटातच बाद झाले आहेत, पण यंदा त्यांना जेतेपदाची सुवर्णसंधी लाभली आहे. त्यामुळे ‘मुंबई श्री’चे स्वप्न साकार करण्यासाठी हे सारेच जोरदार खेळाडू पुन्हा सज्ज झालेत. त्यामुळे ऐतिहासिक ‘स्पार्टन मुंबई श्री’चा चषक कोण पटकावतो, हे शनिवारीच कळेल.

























































