
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटसह प्रिकॉशन डोसकडे झालेल्या दुर्लक्षामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे समोर आले असताना सरकार मात्र बेफिकीर असल्याचे समोर आले आहे. मुंबईत 92 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी फक्त 15 टक्के लाभार्थ्यांनीच ‘प्रिकॉशन डोस’ घेतला आहे. असे असताना पालिकेकडे फक्त आठ हजार ‘कोव्हॅक्सिन’चे डोस असून कोव्हिशिल्ड आणि कॉर्बोव्हॅक्सचे डोसच शिल्लक नाहीत. त्यामुळे पालिकेसह राज्याच्या टास्क फोर्सनेही राज्य सरकारने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका मांडली आहे.
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सुमारे वर्षभराने 16 जानेकारी 2021 रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. यामध्ये 18 वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले. मात्र आरोग्यतज्ञांकडून कोरोना व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी ‘प्रिकॉशन डोस’ घेण्याच्या सूचना केल्यामुळे जानेवारी 2022 पासून मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीचा ‘प्रिकॉशन डोस’ देण्यास सुरुवात करण्यात आली, मात्र ‘प्रिकॉशन डोस’ला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत पालिकेसह खासगी, राज्य-केंद्र सरकारच्या एकूण 125 केंद्रांवर ‘प्रिकॉशन डोस’ दिला जात आहे.
टास्क फोर्सचाही सरकारला सल्ला
कोरोना होऊन गेलेल्यांमध्ये आणि दोन डोस घेतलेल्यांमध्ये कोरोनाचा सामना करणारी प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. मात्र यानंतर आतापर्यंत बराच कालावधी लोटला असल्याने प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रिकॉशन डोस देणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीत लोक प्रिकॉशन डोस मागतही आहेत, मात्र सद्यस्थितीत डोस उपलब्ध नाहीत. त्यामुळे सरकारने तातडीने लस उत्पादकांशी, केंद्राशी समन्वय साधून डोस उपलब्ध करावेत असा महत्त्वाचा सल्ला दिल्याचे टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितले. टास्क फोर्सच्या माध्यमातूनही केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले.
अशी होतेय कार्यवाही
जानेवारी 2022पासून सुरू झालेला ‘प्रिकॉशन डोस’ आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांना पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत देण्यात येत होता. तर इतर लाभार्थ्यांना खासगी केंद्राकर 250 रुपयांत बुस्टर डोस देण्यात येत होता. मात्र देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त पालिका आणि सरकारी केंद्रांवर ‘बुस्टर डोस’ सरसकट सर्व लाभार्थ्यांना मोफत देण्यात येत आहे. यासाठी ‘कोविन ऍप’मध्ये आवश्यक बदलही करण्यात आले आहेत.



























































