Salim Durani माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन, परवीन बाबीसोबत चित्रपटातही केलं होतं काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचे माजी खेळाडू सलीम दुर्राणी (Salim Durani) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुजरातच्या जामनगर येथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते कर्करोगाने ग्रस्त होते. दुर्राणी यांच्या निधनामुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.

सलीम दुर्राणी यांनी टीम इंडियाकडून एकूण 29 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 1 शतक आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने 1202 धावा केल्या. तसेच गोलंदाजीमध्ये त्यांनी 75 विकेट्सही घेतल्या. फलंदाजीमध्ये 104 धावा ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या असून गोलंदाजीत 177 धावांमध्ये 10 विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे.

सलीम दुर्राणी यांचा जन्म 11 डिसेंबर 1934 ला अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये झाला होता. ते 8 वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब पाकिस्तानमधील कराची येथे रहायला गेले. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब हिंदुस्थानमध्ये आले.

अर्जुन पुरस्कार मिळालेले पहिले क्रिकेटपटू

1960मध्ये सलीम दुर्राणी यांचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. हा पुरस्कार मिळालेले ते पहिले क्रिकेटपटू होते.

प्रेक्षकांच्या मागणीनुसार ठोकायचे षटकार

60-70च्या दशकामध्ये सलीम दुर्राणी यांनी आपल्या अष्टपैलू खेळाने क्रिकेटमध्ये नवी ओळख मिळवली. 1960 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मुंबई कसोटी त्याने पदार्पण केले. विस्फोटक फलंदाजी आणि कामचलाऊ गोलंदाजी ही त्यांची ओळख होती. प्रेक्षकांच्या मागणीनुसार ते षटकारही ठोकत होते. यामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धीही मिळाली.

चित्रपटातही केलं काम

सलीम दुर्राणी यांनी फेब्रुवारी 1973 ला इंग्लंडविरुद्ध मुंबईत आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. याच वर्षी त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटनंतर त्यांनी आपला मोर्चा चित्रपट क्षेत्राकडे वळवला. ‘चरित्र’ या बॉलिवूडपटामध्ये त्यांनी काम केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत तेव्हाची आघाडीची अभिनेत्री परवीन बाबी झळकली होती.