चंद्रभागेच्या तीरी भाविकांची मांदियाळी; चैत्री वारीसाठी चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा रविवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत हरिनामाच्या जयघोषात पार पडला. उन्हाची पर्वा न करता रखरखत्या उन्हात भाविक चंद्रभागा स्नान व विठ्ठल दर्शनासाठी गर्दी करत जवळपास चार लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. विठ्ठल-रखमाईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून भाविक शिखर शिंगणापूरला जात असल्याने चैत्री वारी ही धावती वारी असल्याचे दिसून आले.

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेत सुमारे एक लाख भाविक होते. ही दर्शन रांग पत्राशेडपर्यंत गेली होती. यासोबत मंदिर परिसरात मुखदर्शन व कळस दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. नेहमीप्रमाणे चंद्रभागेचे वाळवंट स्नानासाठी आलेल्या भाविकांनी फुलून गेले होते. वर्षानंतर निर्बंधमुक्त चैत्री यात्रा भरली असल्यामुळे ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी भाविक दर्शनरांगेतून जात होते. यावेळी मंदिर समितीच्या वतीने खिचडी, चहा, पाणी, ताक, मठ्ठा आदींची मोफत व्यवस्था करण्यात आली असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

भक्तिसागर 65 एकर येथेदेखील भाविक तंबू, राहुटय़ा उभारून भजन, कीर्तन व प्रवचनात दंग झालेले आहेत, मात्र गतवर्षीच्या चैत्री यात्रेच्या तुलनेत येथे भाविकांची संख्या कमी आहे. दरम्यान, यात्रेला आलेला भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन झाले की शिखर शिंगणापूरला यात्रेला जात असल्याचे चित्र दिसून येत होते. त्यामुळे चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसरातच भाविकांची जास्त गर्दी दिसत होती.

म्हणून उपवास असूनही विठुरायाला पुरणपोळीचा महानैवेद्य

रविवारी चैत्र शुद्ध एकादशीला उपवास असूनही विठुरायाला दुपारी पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविण्यात आला. पुरणपोळीचा महानैवेद्य देण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही पाळली जाते. याचे कारण म्हणजे भाविक चैत्री एकादशीला पंढरीत येऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन शिखर शिंगणापूरला जातात. येथे शंकर-पार्वतीचा विवाह सोहळा असतो. या विवाहाला साक्षात विठुरायाही गेले आणि लग्नात पंचपक्वान्नाचे भोजन केले अशी आख्यायिका वारकरी संप्रदायात सांगितली जाते. त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य हे चैत्री यात्रेचे खास वैशिष्टय़ मानले जाते.