संसद अधिवेशनाचे आज सूप वाजणार; सलग 14 दिवस कामकाज ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. उर्वरित दोन दिवसांत तरी संसदेचे कामकाज सुरळीतपणे पार पडेल ही अपेक्षा आजही फोल ठरली. सलग चौदाव्या दिवशी संसदेत कामकाज होऊ शकले नाही. दोन्ही सभागृहांत झालेल्या गदारोळामुळे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. आवश्यक कार्यवाही पार पडल्यानंतर उद्याच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजेल.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धात हिंडेनबर्गचा अहवाल आणि राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेले विधान या दोन्ही मुद्दय़ांवरून दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी ताठर भूमिका घेतल्याने संसदेच्या चौदा बैठका निष्फळ ठरल्या. केवळ आवाजी मतदानाने कामकाज उरकण्यात आले. आजही लोकसभेत आवाजी मतदानाद्वारे कोस्टल एक्वा कल्चरसंदर्भातील दुरुस्ती विधेयक सभापटलावर मांडले. नेहमीप्रमाणे लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी अदानी मुद्दय़ावर ‘वुई वॉण्ट जेसीपी’ अशा घोषणा देत वेलमध्ये प्रवेश केला, तर दुसरीकडे सत्तारूढ पक्षाचे खासदार ‘राहुल गांधी माफी मांगो’? चे नारे देत होते. त्यामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी 2 व त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केले.

राज्यसभेतही घोषणाबाजी

राज्यसभेतही कामकाजाला या घोषणाबाजीनेच सुरुवात झाली. सभागृह शांततेने चालू द्या, असे आवाहन सभापती जगदीप धनखड यांनी केले, मात्र त्याला दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी काही दाद दिली नाही. या गदारोळातच सभापतींनी तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते सुखेंदू शेखर राय आणि धर्मा या दोन विद्यमान सदस्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब केले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.