‘बेस्ट’च्या ताफ्यात आणखी 60 गारेगार प्रीमियम बस, दोन अतिरिक्त मार्गांवर सेवा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना गारेगार प्रवासाची सेवा देणाऱया ‘बेस्ट’च्या ताफ्यात आणखी 60 प्रीमियम बस आल्या असून आणखी दोन मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ‘बेस्ट’च्या ताफ्यात आधी 32 प्रीमियम बसेस आहेत. सद्यस्थितीत सहा बस मार्गावर ही सेवा सुरू असून आजपासून ठाणे ते अंधेरी (पूर्व) बसस्थानक आणि साकीनाका गुंदवली मेट्रो स्थानक ते वांद्रे-कुर्ला संकुलपर्यंत असे दोन नवीन बसमार्ग सुरू करण्यात आल्याची माहिती ‘बेस्ट’ प्रशासनाकडून देण्यात आली.

‘बेस्ट’च्या प्रीमियम बसेसने दररोज सरासरी 5000 प्रवाशांपेक्षा अधिक प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. नव्या दोन्ही बसमार्गांवर सकाळी 7.30 ते 11.30 आणि संध्याकाळी 4 ते रात्रौ 8 वाजेपर्यंतच्या गर्दीच्या वेळेमध्ये 15 मिनिटांच्या अंतराने लक्झरी बसगाडय़ा प्रवर्तनासाठी उपलब्ध आहेत. दरम्यान, विमानतळ मार्गावर धावणाऱया प्रीमियम बसेसने प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता सध्याच्या 45 मिनिटांच्या अंतराऐवजी 30 मिनिटांच्या अंतराने दक्षिण मुंबई ते विमानतळ आणि खारघर ते विमानतळ याकरिता सदर प्रीमियम बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

‘चलो ऍप’ वापरणाऱयांना ‘बेस्ट’ ऑफर, महिन्याच्या पासमध्ये 500 रुपयांची सवलत

‘चलो ऍप’ वापरणाऱया ग्राहकांना ‘बेस्ट’ प्रवाशांना आकर्षक मिळणार आहे. 30 दिवसांच्या पासची रक्कम 1250 वरून 750 पर्यंत कमी करण्यात आली आहे. म्हणजेच प्रवाशांना महिन्याच्या पासमध्ये तब्बल 500 रुपयांची सवलत मिळणार आहे. खासगी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 30 दिवसांचा विद्यार्थी पासमध्ये फक्त 200 रुपयांमध्ये 60 फेऱयांची सवलत दिली जाईल. तर ज्येष्ठ नागरिक 28 दिवस आणि त्याहून अधिक कालावधीच्या सर्व सुपर सेव्हर योजनांवर 50 रुपयांच्या सवलत घेऊ शकतील.