
अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील महाकाली माता ही चंद्रपूरचे दैवत आहे. इथे दरवर्षी चैत्रातील नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मोठी यात्रा भरत असते. महाकाली देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे येत असतात. मात्र प्रशासनाच्या अत्यंत बेजबाबदार आणि ढिसाळ नियोजनामुळे या भाविकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. सगळ्यात मोठी गैरसोय ही स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची झाली आहे.
चंद्रपुरातील झरपट नदी ही भाविकांसाठी अत्यंत पवित्र नदी मानली जाते. यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे की या नदीत स्नान केल्याशिवाय यात्रा केल्याचे पुण्य लाभत नाही. इथे स्नान केल्यानंतरच भाविक देवीच्या दर्शनाला जात असतात. या नदीवर भाविकांची प्रचंड श्रद्धा असून या नदीचे पाणी भाविक तीर्थ म्हणून प्राशन करत असतात. मात्र नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने इथले पाणी प्रदूषित आणि गढूळ झाले आहे.
इथे येणाऱ्या भाविकांमध्ये महिलांची संख्या ही मोठी असते. या महिलांसाठी ना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, ना कपडे बदलण्यासाठीची. या महिलांना पुरुषांसोबतच आंघोळ करावी लागत होती आणि मिळेल तो आडोसा धरून कपडे बदलावे लागत होते. इथल्या अस्वच्छतेची आणि गैरसोयीची बातमी करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली होती. याचा पत्रकारांच्या संघटनांनी निषेध केला आहे.
या यात्रेची सुरुवात गोंड राज्याच्या महाराणी हिराई यांनी 1714 साली केली होती. ही यात्रा महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रांपैकी एक असून मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक या यात्रेसाठी येत असतात. चैत्रातील नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपुरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महाकाली यात्रेच्या निमित्ताने गायक कैलास खेर याच्या संगीत कार्यक्रमासाठी 1 कोटी रुपये शासनाने खर्च केले होते. गाण्याच्या कार्यक्रमासाठी पैसा खर्च करणाऱ्या शासनाने गोरगरीब भाविकांच्या सोयीसाठी मात्र छदामही खर्च केला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यात्रेसाठी आलेल्या भाविकांसाठी शौचालयाची सोय नाही, कुठेही स्वच्छता नाही, कोणत्याही प्रकारची सुविधा नाही असं या यात्रेसाठी आलेल्या भाविकांचे म्हणणे आहे.
स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब
चंद्रपूर मनपाला स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळाला आहे. अशा या पुरस्कारप्राप्त मनपाचे यात्रा महोत्सवाकडे कमालीचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. यात्रा परिसरातील अस्वच्छता बघून काही भक्तांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तिथले भाडे दिवसाला पाचशे रुपये असल्याने ते भाविकांना परवडत नाही.




























































