
>> द्वारकानाथ संझगिरी
सुधीर नाईक गेला आणि माझा मोबाईलही स्तब्ध झाला. त्यालाही सुधीरचा आवाज ऐकण्याची सवय झाली होती. आठवडय़ातून एक-दोन फोन. फोनवर क्रिकेटची चर्चा ही ठरलेली. कधी इतर विषयांवरही होई. वसुंधरा पेंडसे-नाईक त्याची अर्धांगिनी, अप्पा पेंडसे सासरे. त्यामुळे त्याला इतर विषयांतसुद्धा गती होती. तो फोन आता कायमचा थांबला.
सुधीर आणि माझी ओळख साधारण 1980 ची. त्यावेळी त्याच पहिल्या दर्जाचं क्रिकेट थांबलं होतं. त्यावेळी मी ‘लोकप्रभा’ साप्ताहिकामध्ये लिहीत असे. वसुंधरा पेंडसे-नाईक संपादिका होत्या. मुंबई क्रिकेटवर लेख लिहायच्या संबंधात माझी सुधीरची भेट झाली. पुढे मैत्री आणि ती तो जाईपर्यंत टिकली. मग ‘षटकार’ आम्ही सुरू केलं आणि मुलाखत-गप्पांच्या निमित्ताने ही मैत्री वाढली.
सुधीरचं क्रिकेटचं ज्ञान उत्तम होतंच, तो उच्चशिक्षित क्रिकेटपटूही होता. पण त्याच्याकडे ते समजून सांगण्याची हातोटी होती. तो चांगला कोच होता. नॅशनल या त्याच्या क्लबच्या नेटवर एकदा श्रीरामपूर इथून झहीर खान आला. सुधीरने त्याच्यावर नजर टाकली आणि त्याने चक्क आदेश दिला, ए डिव्हिजनच्या प्रत्येक मॅचमध्ये हा असायला हवा. कॅप्टनपूर्वी त्याचं नावं हवं. झहीरला ए डिव्हिजन म्हणजे काय माहीत नव्हतं, पण सुधीरने भावी हिंदुस्थानी वेगवान गोलंदाज शोधला होता. सुधीर हॉस्पिटलात असताना झहीर त्याला तातडीने पाहून आला. तोही ऋण जाणत होता.
नॅशनल क्लबने अनेक क्रिकेटपटू मुंबई आणि हिंदुस्थानला दिले. तो मुंबईच्या निवड समितीचा भाग असताना सचिन तेंडुलकरने रणजी पदार्पण केलं. हिंदुस्थानसाठी तो 3 कसोटी आणि दोन वन डे खेळला तरी आघाडीचा फलंदाज म्हणून मुंबईसाठी त्याची काँट्रिब्युशन मोठी होती. त्याच्या कारकीर्दीचा सर्वोत्कृष्ट बिंदू म्हणजे मुंबईने 1971 साली मोठे खेळाडू नसताना चंदू बोर्डे यांच्या बलाढय़ महाराष्ट्रविरुद्ध जिंकलेली ट्रॉफी. कोवळय़ा मुलांचा संघ त्याने बांधला.
आम्ही एजीस लाईफ इन्शुरन्सतर्फे अनेक माजी खेळाडूंचा त्यांनी हिंदुस्थानी क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करून एक रक्कम त्यांना देतो. सुधीरला तशी आम्ही एकदा दिली होती. त्यावेळी त्याने त्या रणजी मॅचचा किस्सा रंगवून सांगितला. त्या किश्श्यामुळे आमचा एजीस लाईफ इन्शुरन्सचा सीईओ आणि माजी मुंबई वेगवान गोलंदाज इतका भारावून गेला की, आम्ही त्या संपूर्ण संघाचा भरघोस रक्कम देऊन सत्कार केला. त्यांच्या डोळय़ातील आनंदाश्रू ही आमची एक फार मोठी मिळकत आहे. एका मॅचवरचा समारंभ इतका अप्रतिम होईल याची मला कल्पना नव्हती.
78 वय असलेल्या सुधीरभोवती मृत्यू घोंगावत आहे याची मला पुसटशी कल्पना नव्हती. अजूनही शाळेचा युनिफॉर्म, क्रिकेटचे कपडे तुला होतील असं मी गमतीत म्हणायचो. गमतीलाही दृष्ट लागते हे मला ठाऊक नव्हतं.

























































