मिंधे सरकारच्या मनमानीमुळे अभियंत्यांची पदोन्नती रखडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ऑक्टोबर 2021 मध्ये आदर्श सेवा नियमावली प्रसारित करण्यात आली. मात्र मिंधे सरकारने मनमानी करून त्या नियमांना बगल देत नवे नियम बनवले. त्या नव्या नियमांमुळे अभियंत्यांची थेट भरती होणार आहे. परिणामी शासनाच्या विविध विभागांमध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱया हजारो अभियंत्यांची पदोन्नती रखडणार आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राजपत्रित अभियंता संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, ऊर्जा, सिंचन आदी विभागांमध्ये हजारो अभियंते काम करतात. राज्यात अभियांत्रिकीचे सेवा प्रवेश नियम सन 1970 मधील आहेत. दर 25 वर्षांनी सेवा नियमांचा आढावा घ्यायचा असतो. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात 2019 मध्ये अभियंता संघटनेच्या आग्रही मागणीमुळे तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सेवा नियमांसाठी 18 सदस्यीय एक समिती गठीत केली होती. समितीने उपअभियंत्यांची 100 टक्के पदे पदोन्नतीने भरण्याची शिफारस केली होती. त्या सेवा नियमांना डावलून नवे सेवा नियम शिंदे सरकारकडून रेटण्यात येत आहे, असा आरोप अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटणकर यांनी केला आहे. राज्य सरकारने योग्य ती सेवा नियमावली करावी, अन्यथा आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असा इशारा शिंदे सरकारला दिला आहे.