सज्जनगड घाटात जीप कोसळली; चालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरापासून हाकेच्या अंतराकर सज्जनगडावर जात असताना 800 फूट दरीत तवेरा कार कोसळून चालक ठार झाला. अजित सूर्यकांत शिंगरे (वय 31, रा. सज्जनगड, ता. सातारा) असे त्यांचे नाव आहे. ही घटना मध्यरात्री घडली. सकाळी पोलीस, ग्रामस्थांनी अथक प्रयत्नानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढला. दरम्यान, मृत अजित शिंगरे याच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडली आहे.

अजित याचे साताऱ्यात मोबाईल शॉपीचे दुकान आहे. अधूनमधून तो बदली चालक म्हणून काम करत होता. पुणे येथील एक भाडे मिळाल्याने सकाळी तो लवकर गेला होता. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तो साताऱ्यात आल्यानंतर कुटुंबीयांना फोन करून 11.30 पर्यंत पोहचतो, असेही त्याने सांगितले. मात्र, 12 वाजून गेल्यानंतरही अजित आला नसल्याने कुटुंबीय फोन लावण्याचा प्रयत्न करत होते. फोन लागत होता. मात्र अजित फोन उचलत नव्हता.

मध्यरात्री 1 च्या सुमारास मात्र सज्जनगड घाटातून कार दरीत कोसळली असल्याचा फोन अजितच्या कुटुंबीयांना आला. या घटनेने शिंगरे कुटुंबीयांची चलबिचल झाली. मध्यरात्री कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता, अजित चालवत असलेली कार पाहून कुटुंबीयांनी टाहो फोडला. सुमारे 800 फूट खोल दरीत कार कोसळली होती. अपघाताबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे तपासकामाला अडथळा येत होता. सकाळी शोधमोहीम राबवण्यात आली. मृतदेह दरीतून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी तो जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.