
चित्रपट निर्माते, देवमाणूस मालिकेतील ‘लाला’ म्हणजेच डॉ. शशिकांत डोईफोडे यांचा 22 वर्षीय मुलगा चिराग डोईफोडे कमर्शिअल पायलट झाला आहे. मुलगा पायलट झाल्यावर आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांनी ग्रामदैवतेवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली.
चिरागला लहानपणापासून पायलट होण्याची इच्छा होती. त्याचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण माण तालुक्यातील पळशी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. बारावी पास झाल्यानंतर त्याने डीजीसीएअंतर्गत विविध परीक्षा दिल्या. या स्पर्धा परीक्षा चिराग दीड ते दोन वर्षांमध्येच पास झाला. दिल्ली, बारामती, आसाम, बंगळुरू येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गेल्या आठवडय़ातच त्याला कमर्शिअल पायलटचा परवाना मिळाला. चिराग आता गगनभरारी घेण्यास सज्ज झाला आहे.
शशिकांत डोईफोडे म्हणाले, ‘‘गेल्यावर्षी ग्रामदैवताच्या दर्शनासाठी आम्ही दोघे गेलो असता मी मुलगा वैमानिक झाल्यावर पुष्पवृष्टी करेन अशी इच्छा बोललो होतो. त्याप्रमाणे चिराग वैमानिक झाल्याने हनुमान जयंतीला ग्रामदैवत हनुमान मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
केली. त्यासाठी पळशी येथे हेलिपॅड तयार केले होते. सातवीत असताना मुलाने जे स्वप्न बघितले होते, ते पूर्ण झाल्याचा आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
























































