Gautami Patil गौतमी पाटीलला लगीनघाई; म्हणाली, ‘मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा अन्…’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गौतमी पाटील हे नाव सध्या महाराष्ट्रात तुफान गाजतंय. पंजाबी सुटमधील तिचा स्टेजवरील तेजतर्रार डान्स पाहण्यासाठी तरुण गर्दी करतात. एका बाजूने तिच्यावर टिकेचा वर्षावही होत असून दुसरीकडे मात्र तिला मिळणाऱ्या नृत्याच्या सुपाऱ्या काही कमी झालेल्या नाही. संपूर्ण महाराष्ट्रात तिची क्रेझ पहायला मिळत आहे. तरुणांच्या मनावर सध्या राज्य करणाऱ्या गौतमी पाटीलच्या खासगी आयुष्यामध्येही अनेकांना रस असून ती लग्न कधी करणार याचीही सर्वांना उत्सुकता आहे. आता तिने स्वत: आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा सांगितल्या आहेत. @theoddengineer या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने लग्नाबाबत भाष्य केले आहे.

मुलाखतीदरम्यान गौतमीला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तिने तात्काळ हो, मला लग्न करायचे आहे असे म्हटले. माझे प्राथमिक शिक्षक मुलींच्या शाळेत झाले असून बाबांच्या निधनानंतर घरात कोणीच पुरुष नव्हता. ना वडील, ना भाऊ, ना नातेवाईक. त्यानंतर माझा कधीच कोणत्याही पुरुषाशी वैयक्तिक संबंध आला नाही. त्यामुळे घरातील जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मला लग्न करायचे आहे, असे गौतमी म्हणाली.

गौतमी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षाही यावेळी सांगितल्या. मला पैसा, बंगला, प्रतिष्ठा या कशाचीही गरज नाही. परंतु येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे. जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन. आता मी 25 वर्षांची असून माझे लग्न झालेले नाही. परंतु लवकरच लग्नबंधनात अडकण्याची माझी इच्छा आहे, असेही गौतमी म्हणाली.

चित्रपटात झळकणार

गौतमी पाटील हिला मराठी सिनेसृष्टितील एका चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली आहे. ‘घुंगरू’ या चित्रपटात गौतमी दिसणार आहे. नुकताच तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर समोर आला आहे.

लोककलेची ‘गौतमी पाटील’ करू नका!

शंभर लोकांच्या तमाशा कार्यक्रमाला दोन लाख रुपये देताना अनेक गावकरी गयावया करतात, मानधन कमी करण्यासाठी विनंती करतात, पण गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात चार मुली आणि पाचवी गौतमी यांना पाच-पाच लाख रुपये मोजतात. याला काय म्हणायचं, अशी खंत ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडेकर यांनी व्यक्त केली. तसेच लोककलेची गौतमी पाटील होऊ देऊ नका. लोककला ही लोककलाच राहिली पाहिजे, तिचा ऱ्हास होऊ देऊ नका, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.