प्रॉमिसिंग – दिशा देणारे नाटय़ प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश आचवल

 सध्या झी मराठीवर लोकप्रिय होत असलेली मालिका म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा.’ या मालिकेत ‘अधिपती’ ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे ऋषिकेश शेलार, एक प्रॉमिसिंग चेहरा.

 ऋषिकेश मूळचा सांगलीचा. शाळेत असल्यापासून त्याला अभिनयाची आवड होती. सांगलीच्या कॉलेजमधून बीएस्सी करत असताना त्याने अनेक एकांकिका स्पर्धा केल्या. महाराष्ट्रभर सादर होणाऱया एकांकिका स्पर्धातून त्याने पारितोषिकेदेखील मिळवली. पुण्याला नाटकाचे चांगले वातावरण आहे, असे कळल्याने तो पुण्याला त्याची नाटय़विषयक आवड जोपासण्यासाठी आला. त्याने मार्पेटिंगमध्ये एमबीए केले. पुण्यातील काही नाटय़विषयक ग्रुपमधून एकांकिका  केल्या. मार्पेटिंग क्षेत्रात जॉब मिळाल्यावर नोकरी आणि नाटकाची आवड हे दोन्ही जपणे कठीण होऊन गेले. मुळात अभिनयाची आवड असणाऱया ऋषिकेशचे मन नोकरीत लागत नव्हते. त्याचदरम्यान डॉ. श्रीराम लागू यांचे ‘लमाण’ हे आत्मचरित्र वाचून तो प्रभावित झाला होता आणि त्यानंतर त्याने पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात करीअर करण्याचा निर्णय घेऊन नोकरीचा राजीनामा दिला. एनएसडीच्या मुलाखत फेरीपर्यंतदेखील तो पोहोचला होता. तिथे त्याला सतीश आळेकर भेटले आणि त्यांच्याकडून त्याला मुंबईमधील अॅपॅडेमी ऑफ थिएटर आर्टबद्दल कळले. मुंबईला तो नाटय़शास्त्र्ाात एमए करण्यासाठी आला. तो म्हणतो, ‘‘या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाने मला खूप काही शिकता आले. अनेक मान्यवर मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाची प्रक्रिया समजून घेता आली.’’ हा अभ्यासक्रम पूर्ण होताच दिग्दर्शक विजय पेंकरे यांनी ऋषिकेशला ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकात एक भूमिका दिली. या नाटकामुळे प्रियदर्शन जाधवशी त्याची मैत्री झाली. या नाटकाचा परदेश दौरादेखील झाला. मग ‘लक्ष्मी सदैव मंगलम’मध्ये त्याला भूमिका मिळाली. ‘सावित्री ज्योती’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ अशा काही मालिकांत त्याने काम केले.

लॉकडाऊनच्या काळात ऋषिकेशने ‘हॅम्लेट’ या जगप्रसिद्ध नाटकाचे एका वेगळय़ा प्रकारे रूपांतर केले. गावातला मुलगा ‘हॅम्लेट’ कसे कथन करेल, असा दृष्टिकोन मांडून त्याने ते नाटक चित्रित केले. त्याचदरम्यान ‘सुंदरा मनामध्ये भरली ’ या मालिकेतील ‘दौलत’ या खलनायकी भूमिकेने त्याला वेगळी ओळख दिली. आता ‘अधिपती’ या भूमिकेतून तो पहिल्यांदाच प्रमुख नायकाच्या भूमिकेत आहे. ऋषिकेश म्हणाला, ‘‘अधिपतीची व्यक्तिरेखा ही खूप शेड्स असणारी आहे.   हा अतिशय श्रीमंत असून मातृभक्त आहे. त्याने नववीतच शाळा सोडलेली आहे. शिक्षण महत्त्वाचे नसून अक्कल आणि पैसे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हा त्याच्या आईचा दृष्टिकोन आहे आणि अधिपतीचाही त्यावर विश्वास आहे. त्याच्या मालकीची शाळा असते आणि तिथे त्याची भेट ‘अक्षरा’ या शिक्षिकेशी होते. आता पुढे हे मालिका काय वळण घेईल, हे तुम्हाला कळेलच.’’