भाजप खासदाराची घोषणा कोरडीच; नगरमध्ये पाणीटंचाई कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्चअखेरपर्यंत ‘फेज-2’ अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होऊन एप्रिल महिन्यात नगर शहरातील नागरिकांना पूर्ण दाबाने व मुबलक पाणी मिळेल, अशी घोषणा भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी केली होती. मात्र, एप्रिलचे 10 दिवस उलटून गेले तरीही नगरमध्ये पाणीटंचाई सुरूच आहे. त्यामुळे भाजप खासदाराने केलेली मुबलक पाण्याची घोषणा कोरडीच होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नगर शहराला 40 किलोमीटर दुरून पाणी आणले जाते. त्याचबरोबर एमआयडीसी, तसेच भिंगार या ठिकाणीही पिण्याचे पाणी पुरविले जाते. पूर्वी लोकसंख्या कमी असल्याने पाणी मुबलक मिळत होते. आता शहरीकरण वाढले, लोकसंख्या वाढली. पाण्याची म्हणावी अशी रचना करण्यात आलेली नव्हती. आजही अनेक ठिकाणी पाण्याची मोठी अडचण आहे. त्यातच एमआयडीसीला येथूनच पाणीपुरवठा करण्यात येतो. आता तर नव्याने सुपा एमआयडीसी विकसित झाल्यामुळे तेथेही याच पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होतो. दुसरीकडे वीजपुरवठा सातत्याने खंडित झाल्यामुळे नगर शहराला वर्षभरात अवघे दीडशे दिवस पाणी मिळते. उर्वरित दिवस पाणी मिळत नाही. आजही दिवसाआड शहराला पाणी मिळत आहे. त्यातच अनेक ठिकाणी खराब पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नगर शहराला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, या दृष्टिकोनातून तत्कालीन महापौर सुरेखा कदम यांच्या नेतृत्वाखाली विशेष बैठका घेऊन पाणीपुरवठय़ाचे नियोजन आखण्यात आले होते. केंद्र सरकारची ‘फेज-2’ची अमृत पाणी योजना 12 वर्षांनंतरही पूर्णत्वाला जायला तयार नाही. साधारणतः या योजनेवर 125 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. शहरात नव्याने सात टाक्या बांधण्यात आल्या आहेत. पाइपलाइनसुद्धा टाकण्यात आली आहे. एवढे होऊनदेखील नगरकरांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात तर सोडाच, पण नियमितही मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

भाजपचे खासदार सुजय विखे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, तसेच विविध यंत्रणांची एकत्रित किमान 15 वेळा बैठक घेतली. मात्र, त्याचा कोणताच उपयोग झाला नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मार्चअखेरपर्यंत ही योजना मार्गी लावली जाईल, असे सांगितले जात होते; परंतु या योजनेलाच घरघर लागली की काय. असे चित्र आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नगर शहरामध्ये गंभीर झाला आहे. नागरिकांनी आंदोलने करूनही प्रशासनाला जाग येत नाही.

एकंदरीतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नगर शहरामध्ये आता गंभीर झाला आहे. भाजपचे खासदार सुजय विखे यांनी तीन महिन्यांपूर्वी नगरकरांना मार्चअखेरीस पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, आज एप्रिल महिना निम्म्यावर आला तरीही पाणी मिळायला तयार नाही व योजनाही पूर्णत्वाला गेलेली नाही. त्यामुळे ‘बोलाचीच कडी व बोलाचाच भात’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.