
खलिस्तानवादी अमृतपाल सिंग यांच्या चिथावणीखोर विधानामुळे पंजाबमधील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आज पहाटे भटिंडा लष्करी तळावर गोळीबाराची घटना घडली. यात चार जवान शहीद झाले. मात्र, हा दहशतवादी हल्ला नव्हता, असे लष्कराने स्पष्ट केले आहे.
पंजाबच्या भटिंडा लष्करी तळावर बुधवारी पहाटे 4.35 च्या सुमाराला गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात चार जवान शहीद झाले. हे चौघेही जवान मंगळवारी आपले कर्तव्य बजावून परतले होते. 80 मीडियम रेजिमेंटचे होते. घटनेची माहिती समजताच लष्कराच्या शीघ्र कृती दलाने तात्काळ तळाला वेढा घातला आणि परिसर चारही बाजूने सील केला.
दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल
लष्कराने रात्री भटिंडा पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. मास्क घातलेल्या, कुर्ता-पायजमा अशा साध्या वेशातल्या दोघा तरुणांवर संशय असून यापैकी एकाच्या हातात कुऱहाड होती. गोळीबार करून दोघे जण तळाला लागून असलेल्या जंगलात गडप झाले, असा दावा लष्कराने एफआयआरमध्ये केला आहे.
चोरी झालेल्या रायफलमधून गोळीबार
या लष्करी तळावर 9 एप्रिलला एका जवानाची इन्सास ही रायफल चोरी झाली होती. याच चोरी झालेल्या रायफलमधून हा गोळीबार झाल्याचा संशय लष्कराने व्यक्त केला आहे. घटनास्थळी सापडलेले साहित्य पोलिसांच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

























































