
उन्हाचा कडाका वाढला आहे, रणरणत्या उन्हात अंगाची काहीली होत आहे. या काळात उष्माघाताचा त्रास सुरू होतो. या कडक उन्हापासून वाचण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे उष्माघात म्हणजे काय, तो नेमका कसा होतो आणि त्याची लक्षणे काय आहेत ते जाणून घेऊया.
वातावरणातील तापमान खूप वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उष्माघात होतो. त्यावेळी त्या व्यक्तीला ताप येणे, डोळ्यांची आग होणे, खूप तहान लागते, डोळ्यासमोर अंधारी येणे, अतिघाम येणे, मळमळ, उलट्या, घबराट आणि जास्त प्रमाणात थकवा, त्वचा निळी पडणे, शरीराचे तपमान अचानक कमी होणे, रक्तदाब आणि नाडीचे ठोके कमी होणे अशी लक्षणे दिसतात. वेळेत उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होते.
उष्माघातपासून अशी घ्या काळजी
– या दिवसांमध्ये पांढरे कपडे घालावेत, शक्यतो या दिवसांमध्ये काळे कपडे घालणे टाळावे.
– उन्हात बाहेर पडताना डोक्यावर टोपी घालणे, स्कार्फ गुंडाळणे, काही नसल्यास रूमाल तरी डोक्यावर ठेवावा.
– शरीरात पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी या दिवसांमध्ये वारंवार पाणी पिणे, लिंबू सरबत, लस्सी, वाळा-सरबत प्यावे.
– उन्हातून आल्यावर लगेच फ्रिजचे थंड पाणी शक्यतो टाळलेले बरे.
– उन्हाळ्यात दुचाकीवरून प्रवास करताना किंवा फिल्डवर काम करताना डोक्यात हेल्मेट, टोपी आणि रूमाल बांधावा.
– डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सनग्लासेसचा वापर करावा.
– उन्हाळ्याच्या दिवसात कुठेही बाहेर पडताना पाण्याची बाटली हमखास ठेवावी.



























































