
> हरिवंश चतुर्वेदी
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशात उच्च शिक्षणाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि दबदबा वाढविण्यासाठी देशातील शैक्षणिक संस्थांची वाटचाल ही परदेशातील विद्यापीठांसमवेत व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी परदेशी विद्यापीठांच्या आगमनाला यूजीसीने काही महिन्यांपूर्वी हिरवा कंदील दाखवला. तथापि, विदेशी शिक्षण संस्थांनी देशातील आघाडीच्या शिक्षण संस्थांशी भागीदारी केल्यानंतरच हिंदुस्थानात येण्याची मुभा देणे गरजेचे आहे. विमा कंपन्यांच्या बाबतीत 2000 मध्ये अशीच अट घातली होती आणि ती यशस्वी ठरली. म्हणून यावेळीहीदेखील ही अट दोन्ही पक्षांसाठी फायद्याची राहू शकते.
हिंदुस्थानात सध्या परदेशी विद्यापीठांचे संभाव्य आगमन आणि शैक्षणिक संस्थांची वाढणारी संख्या हा चर्चेचा विषय ठरत आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने जारी केलेल्या एका गाइडलाइनमधील मसुद्यावरच्या लोकांच्या सूचना, प्रतिक्रिया मागविण्याची प्रक्रियादेखील पूर्ण केली आहे. आता सरकार काय पाऊल टाकते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. अर्थात ही बाब नवीन नाही. मागच्या यूपीए सरकारच्या काळातही यासंदर्भातील सात विधेयके तयार करण्यात आली. मात्र विरोधांमुळे ही विधेयके सभागृहाच्या पटलावर मांडली गेली नाहीत. विरोधाचे कारण म्हणजे परदेशातील संस्था, विद्यापीठे देशातील विद्यापीठांच्या स्थितीवर परिणाम करू शकतात, असे बोलले गेले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशात उच्च शिक्षणाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि दबदबा वाढविण्यासाठी देशातील शैक्षणिक संस्थांची वाटचाल ही परदेशातील विद्यापीठांसमवेत व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हिंदुस्थान ही उच्च शिक्षणाची मोठी बाजारपेठ आहे. सुमारे 1.4 अब्ज लोकसंख्येच्या देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 4.13 कोटी आहे. विशेष म्हणजे दरवर्षी सहा ते सात लाख विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी देशाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. यामागचे आणखी एक कारण म्हणजे हिंदुस्थानच्या आघाडीच्या शैक्षणिक संस्थांचे कटऑफ 99 ते 100 टक्क्यांपर्यंत जाते. या कारणांमुळे बरेच विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहतात. सरकारला हीच उणीव दूर करायची आहे. म्हणूनच परदेशातील विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांना हाताशी धरू इच्छित आहे.
परदेशातील विद्यापीठांचे हिंदुस्थानात आगमन होणे हे अनेक अर्थाने फायद्याचे राहू शकते. यातून आपण ‘टॅलेंट क्रायसिस’ म्हणजेच प्रतिभा संकटातून बाहेर पडण्यात यशस्वी ठरू शकतो. एका अहवालानुसार देशातील 50 टक्के महाविद्यालयांत आवश्यकतेपेक्षा निम्मेदेखील शिक्षक नसल्याचे निदर्शनास आले आहे, पण गेल्या तीस वर्षांत उच्च शिक्षण व प्रामुख्याने तंत्रज्ञानविषयक शिक्षणाचा झालेला विस्तार पाहता त्याचा फटका ह्युमॅनिटी आणि शास्त्र् यांसारख्या विषयांच्या विद्यार्थ्यांना बसला. त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी तुलनेने कमी झाल्या. आपल्याकडे आयआयटी, आयआयएमसारख्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था आहेत आणि अनेक प्रकारची केंद्रीय विद्यापीठेदेखील आहेत, परंतु देशातील प्रत्येक तरुण, तरुणीच्या नशिबी अशा संस्थांतील प्रवेश असतोच असे नाही. काही बाबतीत परदेशातील उच्च शिक्षण संस्था या आपल्याकडील संस्थांपेक्षा वरचढ सिद्ध होऊ शकतात. त्याच वेळी विद्यार्थ्यांना चांगली सुविधाही मिळू शकते. चांगले अभ्यासक्रम, अध्यापन अणि अत्याधुनिक शिक्षण पद्धतीमुळे देशात गुणवत्ताप्रधान शिक्षणाचे वातावरण निर्माण होईल. शिक्षकांतही स्पर्धेचे वातावरण राहील.
सध्या हिंदुस्थानात सुमारे 15 लाख शिक्षक उच्च शिक्षणाच्या कार्यात आहेत, पण त्यापैकी अनेक जण स्रोतांच्या अभावी नव्या तंत्रज्ञानापासून दूर आहेत. परकी संस्थांच्या आगमनाने या शिक्षकांत नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी स्पर्धा लागेल. अर्थात, यासाठी काही प्रमाणात किंमतही मोजावी लागेल. आपल्या शिक्षण संस्थांनादेखील मोठा फटका सहन करावा लागेल. आपल्या संस्थेतील चांगले प्राध्यापक परदेशी संस्थांचे वेतन, सुविधा या आकर्षणाला बळी पडू शकतात.
यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यात परकीय संस्थांसाठी कोणत्याच प्रकारचे नियम आणि अटी नसल्याचे म्हटले आहे. आपल्या संस्थांवर असणारे नियम हे परदेशातील संस्थांना लागू होणार नाहीत. साहजिकच त्यांची स्वायत्तता आपल्या संस्थांना मारक ठरू शकते. म्हणून अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी किमान 50 टक्के फॅसिलिटी मुख्य कॅम्पसमध्ये आणणे बंधनकारक करावे लागणार आहे, जेणेकरून या ठिकाणी शिकवणे अनिवार्य राहील.
परकीय संस्थांसाठी पायघडय़ा घातल्या जात असल्या तरी त्यातही प्रश्न असा की, आपल्याकडे येणाऱया परकीय विद्यापीठांची संख्या किती राहू शकते आणि ते हिंदुस्थानकडे वळतील का? बोस्टन कॉलेजचे माजी प्राध्यापक आणि हिंदुस्थानी उच्च शिक्षणाचा अभ्यास करणारे फिलिप ऑल्टबॅक यांच्या मते, हिंदुस्थानात येणाऱया परदेशी विद्यापीठांची संख्या ही एका अर्थाने मर्यादितच राहू शकते. कारण नामंवत विद्यापीठे हिंदुस्थानसारख्या देशात आपले मुख्य कॅम्पस उभारणार नाहीत. कारण त्यांनी आतापर्यंत मूळ देशापासून लांब जात अन्य ठिकाणी कॅम्पस केलेले नाहीत. यास काही अपवाद आहेत. गेल्या पाच दशकांत अमेरिका आणि युरोपमधील काही निवडक विद्यापीठांनी अन्य ठिकाणी कॅम्पस उभारले. अर्थात सुविधा आणि जागा मिळाल्यानंतरच त्यांनी विस्तार केला. सिंगापूर, संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांत ही परदेशातील विद्यापीठे येण्यामागे हेच प्रमुख कारण होते. चीनने तर ‘कम ऍण्ड बिल्ड युअर कंट्री’सारखे अभियान सुरू केले आणि अनिवासी प्राध्यापकांना अनेक सुविधा देऊन मायदेशी परतण्याचे आवाहन केले. त्याचा चीनला फायदादेखील मिळाला. हिंदुस्थान मात्र या गोष्टीपासून बराच लांब आहे. आपले अनेक प्राध्यापक परदेशातील विद्यापीठांत ज्ञानदानाचे काम करत आहेत, परंतु त्यांना परत बोलावण्यासाठी कोणत्याही रीतीने गांभीर्याने प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.
वास्तविक, आपल्या शिक्षण क्षेत्राची स्थिती फार काही चांगली नाही. अनेक प्रकारच्या समित्यांनी निरनिराळे अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण अहवाल सादर करूनही आणि 6 टक्के खर्च करण्याची शिफारस करूनही राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ 3 टक्केच खर्च शिक्षणावर करत आहोत. आज देशात एकूण उच्च शिक्षण संस्थांपैकी 75 टक्के संस्था खासगी लोकांच्या हाते आहेत. सरकारकडून सार्वजनिक शिक्षणावर खर्च सातत्याने कमी केला जात आहे, ही बाब योग्य नाही. उच्च शिक्षण हे देशाच्या सर्वंकष विकासासाठी मोलाची भूमिका बजावते. तसेच या शिक्षण संस्था देशाचा, राज्यांचा आर्थिक विकासाचा वेग वाढविण्यासाठीदेखील महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे ज्या राज्यांनी उच्च शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले, त्या राज्यांचा आर्थिक विकास चांगला राहिला. तामीळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकसारख्या राज्यांचा उल्लेख करता येईल. याउलट बिहार, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांची स्थिती पाहू शकता. साहजिकच, आपल्या संस्था आपल्यालाच सक्रिय कराव्या लागतील. शिक्षण संस्थांकडे स्रोतांचे प्रमाण विपूल असणे गरजेचे असून त्याआधारे ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करतील. प्रत्येक वर्गात स्मार्ट बोर्ड दिले तर शिकवण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होईल. त्यामुळे प्रोफेसर, प्राध्यापकांचे काम सोपे होईल आणि ते अधिक सुलभतेने विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करतील. परदेशातील शिक्षण संस्थांनी देशातील आघाडीच्या शिक्षण संस्थांशी भागीदारी केल्यानंतरच हिंदुस्थानात येण्याची मुभा द्यावी. विमा कंपन्यांच्या बाबतीत 2000 मध्ये अशीच अट घातली होती आणि ती यशस्वी ठरली. म्हणून यावेळीदेखील ही अट दोन्ही पक्षांसाठी फायद्याची राहू शकते.
(लेखक बिमस्टेकचे संचालक आहेत)




























































