
रागाने बघत असल्याच्या किरकोळ कारणातून महाविद्यालयीन तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने भररस्त्यात खून केल्याची घटना सांगली शहरातील बुधगाव येथे घडली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी काही तासांतच चौघांना अटक केली आहे.
राजवर्धन रामा पाटील (वय 18, रा. मतकुणकी, ता. तासगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, सौरव आनंदा कोळेकर (वय 19, रा. जगदाळे प्लॉट, संजयनगर), शैलेश श्यामराव हाके (वय 19, रा. संजयनगर), वरद संजय सकट (वय 19, रा. कुपवाड) आणि गौरव ऊर्फ बंटी विजय चौरे (वय 20, रा. साखर कारखाना कॉलनी) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राजवर्धन याचा मामा राजेश रामचंद्र पाटील (रा. बुधगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
राजवर्धन हा सांगलीतील आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. शिक्षणानिमित्त तो बुधगाव येथील नातेवाईकांकडे राहत होता. महाविद्यालय सुटल्यानंतर तो मित्रांसह कारखाना एसटी थांब्यावरून दररोज बसने घरी जात होता.
गेल्या काही दिवसांपासून संबंधित आरोपी कारखाना चौकात उभे राहून राजवर्धनसह इतर विद्यार्थ्यांची टिंगलटवाळी करीत होते. यावरून त्यांच्यात आणि राजवर्धनमध्ये वादही झाले. याची माहिती राजवर्धनने मामा राजेश पाटील यांना दिली होती. त्यानंतर गुरुवारी (13 रोजी) कॉलेज सुटल्यानंतर राजवर्धन मामा राजेश पाटील यांना घेऊन कारखाना चौकात आला. पाटील यांनी आरोपींना समजावून सांगितले. त्यानंतर चौघांनी बोलण्याचा बहाणा करून राजवर्धनला कारखान्याच्या गेटमधून आत नेले. तेथे कोयता आणि चाकूने मानेवर आणि छातीवर पाच वार करीत राजवर्धनचा खून केला.
घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक क्षीरसागर, शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख, उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवून अवघ्या काही तासांतच चौघांना अटक केली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

























































