दीपशिखा – कर्णपत्नी वृषाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >>जयश्री संगीतराव

जन्मभर “मी कोण…?” म्हणून जगणाऱया महायोद्धय़ाला शेवटी का होईना, त्याची खरी ओळख, त्याचं जीवनरहस्य कळलं, पण शोकांतिका ही की, तेव्हाही तो आपल्या खऱया ओळखीचं बिरुद अभिमानाने भाळी माळू शकला नाही. अशा कर्णाची पत्नी होणं सोपं नव्हतं. वृषाली ही त्याची पत्नीच नाही, तर त्याची जिवाभावाची सखी होती. त्याच्या सुखदुःखात त्याला सांभाळताना तिलाही तारेवरची कसरत करावी लागली असेल. त्याच्या शरीराचा जेवढा भाग दैवी कवचकुंडलांनी रक्षित होता, त्यापेक्षाही महत्त्वाचा त्याच्या मनाचा, हृदयाचा कप्पा सांभाळण्याचं योगदान कर्णाच्या आयुष्यात पत्नी वृषालीचं होतं. कधीतरी तिचं मन हळहळलं असेल, मनावरच्या जखमा भळभळल्या असतील. तिच्या मनीचं गूढ तिच्याच शब्दांत…

पत्नीला पतीची अर्धांगिनी म्हणतात. पतीला आयुष्यभर साथ देण्याची शपथ तिने सप्तपदीच्या मंगल प्रसंगी घेतलेली असते. तिचं आयुष्य म्हणजे पतीच्या पायावर अर्पण केलेलं कमलपुष्पच, पण माझे पती अंगराज कर्णाची मी सर्वस्व होते. माझ्यातली सुज्ञ पत्नी पतीचं दुःख, चिंता न सांगताच ओळखत होती. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी त्यांचा झालेला अपमान व त्यांना मिळालेला नकार त्यांच्या मनाला खूपच लागला होता. ते कुठेतरी शून्यात बघताना दिसले की, मी त्यांना म्हणायचे, “इतकं का तुम्हाला या गोष्टीचं वाईट वाटतंय? मला मिळवून आपण खुश नाही का?” त्यावर ते लटकेच म्हणायचे, “मी कुठे नाराज आहे, पण काही माणसांना खोटं बोलताच येत नाही.” यावर ते खोटं खोटं हसायचे व माझ्या मनावरचा भार हलका व्हायचा, पण खरं सांगू, याप्रसंगी मी नाराज होण्यापेक्षा खुशच होत होते. कारण द्रौपदीने त्यांना नाकारून माझ्या ओटीत खूप मोठं दान टाकलं होतं. कारण त्यामुळेच तेजस्वी कवचकुंडलधारी कर्णाशी माझी जन्मगाठ बांधली गेली.

आमचा संसार सुखाचा चालला होता. दुर्योधनाबद्दल त्यांच्या मनात खूप आदर होता. कारण त्याच्यामुळेच कर्णाच्या मस्तकावर ‘अंगराज’ हे बिरुद लागलं, पण तरीही कधीतरी आपण सूतपुत्र आहोत हे त्यांच्या मनात उफाळून यायचंच. अगदी आपण पिता होणार ही आनंदाची बातमी ज्यावेळी मी त्यांना दिली, तेव्हाही ते आनंदले, पण लगेच त्यांच्या मुखावर मला नाराजीची सावली दिसली. “वृषाली, आपला पुत्र पण सूतपुत्र म्हणूनच ओळखला जाणार ना?” या त्यांच्या प्रश्नाने मी अंतर्मुख झाले. मला कळत नव्हतं, त्यांच्या मनात काय चाललंय? आपल्या कुळाबद्दल ते असं का बोलतात? स्वतची अलौकिक ओळख ते शोधत असतील का? माझ्या मनात प्रश्न यायचे. त्यांना खुश करण्यासाठी मी बोलले, “मी सूत कुळातली आहे, मग आपलं माझ्यावर प्रेम नसावंच.” असं म्हणताच ते माझा हात हातात धरून म्हणाले, “वृषाली, अगं तुझ्याशी विवाह करण्यासाठी एकच काय, मी सात जन्म सूतपुत्र होईन.” ते ऐकताच माझं मन आनंदाने वेडावून जायचं.

आयुष्यातल्या काही घटनांचा मात्र आपल्याला अर्थच लागत नाही. माझ्या प्रथम पुत्राच्या वेळी माता कुंतीची गाठ पडली. का कुणास ठाऊक, माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदराचं स्थान होतं. त्यांचा माझा काहीतरी ऋणानुबंध आहे असं मनोमन वाटायचं. त्या भेटताच मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतलं नि म्हणाल्या, “मुली, तुला काय आशीर्वाद देऊ?” माझ्या मुखातून शब्द आले, “राजमाता, माझ्या पतीसारखा पुत्र कवचकुंडलधारी व्हावा.” यावर “मुली ते कसं शक्य आहे?” असं त्या म्हणाल्या. त्यांचे शब्द ऐकून माझं मन नाराज नक्कीच झालं. त्या साध्वीच्या मुखातून असं का निघावं? असाही विचार माझ्या मनात विषारी नागासारखा फणा काढून असायचा. कधी कधी अंगराज अर्जुनाचा द्वेष का करतात? हा विचारही मन खायचा. एकीकडे आपल्या पतीला सन्मानाने वागवणाऱया दुर्योधनमधला दुर्गुण कळूनही ते मला महान वाटत होते, तर दुसरीकडे माझे पती ज्यांचा द्वेष करतात ते पांडवही मला प्रिय वाटायचे, हे असं का? याचं उत्तर मात्र मला मिळत नव्हतं. म्हणून कौरव, पांडवांचं युद्ध सुरू झालं तेव्हा आपला विनाश होणार हे सत्य डोळय़ांनी दिसत होतं. माझा प्रथम पुत्र व मला प्रिय असलेले शोण भाऊजी अर्जुनाकडून मारले गेले हे कळून मन घायाळ झालं. त्यांची कवचकुंडलं कपटाने दानात मागून घेऊन त्यांच्या शेवटावर शिक्कामोर्तब झालंच होतं. माझं मन कातर झालं होतं. थांबेल तर तो काळ कसला. ते धारातीर्थी पडल्याचे ऐकून माझं मन सैरभैर झालं. काय करावं कळत नव्हतं. मी तशीच धावत जाऊन माझा प्रिय शेला अंगावर घेतला. श्वेत वस्त्र परिधान केलं आणि निघाले आपल्या प्रिय सख्यासोबत अनंतात विलीन व्हायला. चित्त थाऱयावर नव्हतंच, पण हाताने शेल्यात बांधलेली वस्तू हाताळत होते… आणि जाणवलं की, महाराज मला चिडवत आहेत, म्हणत आहेत, आज तरी खरं सांग माझ्यापेक्षा तुला तुझी ही वस्तू जास्त प्रिय आहे ना?” तेव्हा मात्र शेवटी मी कबूल केलंच. कारण अंगराज आणि माझी भेट त्यानेच तर घडवून आणली होती. गंगा-जमुनेच्या तीरावर असलेल्या माझ्या गावात सख्यांबरोबर पाण्याला जात असताना त्यांच्याच अश्वाच्या धक्क्याने माझा पाण्याचा घट फुटला होता. त्यांनी माझी क्षमा मागितली. त्यांचे अदबीचे शब्द ऐकून ते कोणीतरी असामान्य आहेत हे मला कळले. त्यांच्या कवचकुंडलांनी जणू मला मोहिनीच घातली. माझ्या हृदयात मी त्यांना बंदिस्त केलं आणि आम्ही सात जन्मांचे सोबती झालो. म्हणून हा खापराचा तुकडा आमचं मनोमीलन घडवणारा दुवा होता. त्याला मी कसं दूर करणार? पुन: पुन्हा मी त्याला हाताळत राहिले. साऱया जन्माच्या आठवणी डोळय़ांत, मनात दाटून आल्या. त्या साऱयांना सवे घेऊन मी स्वतला माझ्या सख्याच्या चितेत झोकून दिलं. माझ्या अनमोल  वस्तूसहित. दुसऱया जन्मातही ती माझ्या कवचधारीला नक्की माझ्याकडे घेऊन येणार या विश्वासाने. सगळय़ा शंका, सगळे प्रश्न सुटले. मन अगदी शांत, मोकळं झालं. दोन मनं पुन्हा एकत्र झाली. कधीही दूर न जाण्यासाठी… वेगळं न होण्यासाठी…

जीवनरहस्य काय त्यांचे 

कधी न  घेतला वेध त्याचा 

अर्पिले सर्वस्व त्यांना नको त्याविण जन्म दुजा… 

[email protected]