
>>गीतेश शिंदे
माझ्या हाती नसती लेखणी
तर… तर असती छिन्नी
सतार… बासरी अथवा कुंचला
कवी नागराज बाबुराव मंजुळे यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या 2010 साली ‘आटपाट’ प्रकाशनाकडून प्रसिद्ध झालेल्या कवितासंग्रहातील ही पहिलीच कविता. आताशा नागराज मंजुळे यांची फिल्ममेकर म्हणून असलेली प्रतिमा जरी अधिक ठळक असली तरी त्यांच्यातील कवी हा सदैव जागरुक असल्याचे या कविता वाचताना लक्षात येते. किंबहुना सिनेमासृष्टीत यश मिळण्याआधीच्या वा स्ट्रगलिंग फेझमधल्या या कविता असल्याने त्यातील चिंतन अधिक खोल असल्याचेही जाणवते. वरील कवितेत उद्धृत केल्याप्रमाणे कवितागत ‘मी’ला व्यक्त व्हायचेय. त्याच्या काळजात फार काही साचलेय, ते त्याला बाहेर काढायचेय. त्याचा निचरा करायचाय. त्याकरिता तो असे म्हणतो की, माझ्या हाती लेखणी आली म्हणून मी कविता लिहून व्यक्त होतोय, परंतु जर हे माध्यम मला साधले नसते, तर कदाचित मी शिल्पकार झालो असतो वा एखादे वाद्य वाजवून आतील कोलाहलाला वाट मोकळी करून दिली असती किंवा कुंचल्याने माझ्या चित्रांतून ही सारी तगमग कॅनव्हासवर उतरवली असती. कवीला त्याच्या लिहिण्याची, शब्दांची, पुस्तकांची ताकद नक्कीच समजली आहे. त्याला पुस्तक हे शस्त्रासारखेच धारदार वाटते. त्यामुळेच ’मी पुस्तकच परजतो’ या कवितेत मंजुळे लिहितात,
मी एकाकी आहे आणि या निर्घृण जगात
एकटय़ादुकटय़ा माणसानं
स्वरक्षणार्थ काही बाळगावं
म्हणून पुस्तक बाळगतो
खरं तर पुस्तकासारखा मित्र नाही असे आपण अनेकदा ऐकलेले आहे. मित्र जसा अडचणीच्या वेळी आपल्या कामी येतो, त्याप्रमाणे पुस्तकही धावून येते.
दलदलीत धसत जाणाऱयाच्या
हातांहून व्याकूळ होत जातात
माझे दर्शनातुर डोळे तऱहे तऱहेने चाचपून
तुझ्या चेहऱयाच्या रंगरेखा
‘रूक्मांगदा’ या कवितेतून एक व्यक्तिरेखा आपल्यासमोर कवी साकारतो. किंबहुना तो तिला कवितेतून साद घालतो. देहाच्या सीमा ओलांडून एकात्म होण्याचा प्रवास कवीने या कवितेतून रेखाटला आहे. अद्वैताची ही अनुभूती होताना एका क्षणी त्याला असेही वाटते की, हे सारं स्वप्नं आहे.
अजूनही पूजाप्रार्थना वगैरे
करीत असशील तर…
तू त्याच्याकडे
आणखी एका जन्माचा हट्ट धर
मी मात्र मरेन फक्त विश्वास ठेवून तुझ्यावर
प्रेयसीच्या समाधानासाठी फक्त एकदाच नास्तिक असलेला प्रियकर मंदिराच्या पायऱया चढतो. तिला देवासमोर हात जोडून उभी असताना डोळे भरून पाहतो. तो विचारतो, तिने देवाकडे काय मागितले? तर त्यावर ती काहीच न उत्तरता त्याचा हात धरून पुढे चालू लागते. इतकी पुढे की, दोघांचे हात आणि नाते केव्हा मागे सुटतात तेच समजत नाही. आताशा तिची प्रार्थना व्यर्थ गेल्याचेही उमगते, परंतु तरीदेखील ती अजूनही पूजापाठ करत असेल तर तिने देवाकडे आणखी एका जन्माचा हट्ट धरावा असे कवी म्हणतो. निदान पुढच्या जन्मी तरी ते दोघे एकत्र येतील या आशेने तो तिच्यासाठी हसत हसत मरायलाही तयार आहे. सर्वस्व उधळून देणे काय असते हे ही कविता वाचताना जाणवते.
का तू
उन्हाच्या कटाविरूद्ध
गुलमोहरासारखं
त्वेषानं फुलत नाहीस
वैशाखात जेव्हा सर्व वृक्षांची लाहीलाही होत असते तेव्हा गुलमोहर मात्र या विपरीत परिस्थितीतही फुलून येतो. त्याचा तो लालभडक रंग एका अर्थाने विद्रोहाचे प्रतीक आहे असे कवीला वाटते. या कवितासंग्रहातील बहुतांश कवितांमधून सनातनी व्यवस्थेविषयी, चालत आलेल्या अनिष्ट रूढीपरंपरांविषयी आवाज उठवलेला आहे. या कविता व्यवस्थेला जाब विचारतात, पण तरीदेखील त्यातील स्वर टिपेचा नसून तो संयत आहे. ओझ्याखाली पिचलेल्या कष्टकऱयांबद्दल, वंचितांबद्दल हळहळ जरी त्यात असली तरी त्यातून निर्माण होणारी करुणा ही तथागताशी नाते सांगणारी आहे. प्रेमातील विफलतेने काळजावर खोलवर झालेली जखम अजूनही या कवितांतून भळभळते. या संग्रहातील कविता अल्पाक्षरी जरी असल्या तरी त्या अल्पजीवी नक्कीच नाहीत. कारण नागराजने त्यात ओवलेला आशय फार मोठा अन् कालातीत असल्याने त्या काळजाला भिडतात आणि आतील कोलाहलाला वाट करून देतात. ‘बाहेरख्याली उन्हाला’, ‘भुईचा भाबडा पसारा’, ‘खोलवर हंबरत जाण्यासाठी’, ‘अधाशी नखाग्राने’, ‘पावलांतील गुरूत्वबल’ यांसारख्या ओळींमधून नागराजचे अस्सल कवीपण अधोरेखित होते.
उन्हाच्या कटाविरूद्ध
कवी : नागराज बाबुराव मंजुळे
प्रकाशक : आटपाट प्रकाशन
पृष्ठे : 80, मूल्य : 100 रुपये



























































