अद्भुत हरिहरगड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सह्याद्रीच्या डोंगररांगांत अद्भुत असा हरिहरगड (हर्षगड) आहे. गडाच्या कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या पाहून धडकी भरते. हर्षगडाला भेट देऊन नक्कीच हर्ष वाटतो.

नाशिक जिल्ह्यातील हरिहरगड किंवा हर्षगड हा ट्रेक चारकोप अॅडव्हेंचर्स क्लब, कांदिवली या संस्थेने आखला अन् बघता बघता 35 सभासदांनी बस भरली. चारकोपहून 175 किमीच्या प्रवासात त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मंडळी हर्षवाडीत उतरली तेव्हा सकाळचे सात वाजले होते. वाढत्या उन्हाचा त्रास नको म्हणून आम्ही हर्षवाडीतून जाणारी सोपी वाट चढाईसाठी निवडली.

अर्ध्या तासाच्या चढाईने आम्ही एका पठारावर पोहोचलो, तिथं डाव्या हाताला एक आश्रम आहे. आश्रमाच्या ओटय़ावर शिवलिंग व शिव-गणेशाची मूर्ती आहे. त्याखालील पुष्कर्णीच्या भिंतीवर गणेश प्रतिमा व आठ ओळीत कोरलेला देवनागरी लिपीतील शिलालेख आहे. हा शिलालेख शके 1678 म्हणजे सन 1756 काळातील असून तो नानासाहेब पेशव्यांच्या पहिल्या फळीतील सरदार नारोशंकर दाणी यांनी कोरून घेतलेला आहे.

आश्रम पाहून पुन्हा डोंगर चढून काही वेळात आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. गडावर जाणाऱ्या 60-70 अंशातील छाती धडकवणाऱया पायऱया होत्या. मनाचा हिय्या करून एकेक मंडळींनी पायरीशी सलगी केली. या पायऱ्यांत हाताची बोटे रुतावीत इतपत खोबण्या असल्याचे लक्षात येताच सर्वांचा आत्मविश्वास वाढत गेला. अखेर 90-95 सोपानाची वाट चढताना स्वर्गसुखाचा आनंद घेत आम्ही महाद्वाराजवळ पोहोचलो. तोपर्यंत कुणाचे मागे वळून पाहण्याचे धाडस झाले नाही.

 महाद्वारासमोरील कातळावर गणपती, मारुती कोरलेले आहेत. पुढील प्रवास डावीकडे दरी, उजवीकडे व वरच्या बाजूस कातळ अशा अद्भुत मार्गाने सुरू होतो. पॅप्टन ब्रिग्ज याचा उल्लेख ‘रॉक कट गॅलरी’ असा करतो. पुढे अंग चोरत नाळेतून जाताना कातळात कोरलेले जिने लागतात. हा अद्भुत प्रवास अलिबाबाच्या गुहेसारखा भासतो. त्यामुळे सव्वाशे पायऱया व दोन दरवाजे आम्ही कधी पार केले ते कळलेच नाही आणि अंतिम प्रवेशद्वारातून माचीवर आल्यावर एकदम अंधारातून उजेडात आल्याचे जाणवले.

माचीवर घरांची जोती, सदरेचे अवशेष, तीन पाण्याच्या टाक्या व भिंत बांधून पाणी अडविलेला तलाव लागतो. त्याच्या काठावर हनुमानाचे देऊळ, बाजूस शिवलिंग व नंदी आहे. उजव्या हातास  50 फूट उंचीची टेकडी व त्यावर अनेक देव-देवतांच्या मूर्ती आहेत. एव्हाना सर्वांना बऱ्यापैकी भूक लागल्यामुळे तलावाकाठच्या सावलीत बसून घरून आणलेल्या डब्यावर ताव मारला. नंतर शरयूने गडाबाबतची माहिती दिली. गडावर अरुण सावंतची भेट झाली. त्याने गिर्यारोहण क्षेत्राबाबत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल या गडमित्राला नेपाळी टोपी भेट देण्यात आली.

शेवटच्या टप्प्यात ओळीने पाच पाणटाक्या, त्यापुढे कोठी लागते. तिला दरवाजा नाही. त्यामुळे खिडकीतून उडी मारून आत प्रवेश करावा लागतो. 1 हजार 120 मीटर उंची लाभलेल्या या गडाला सात-आठशे फुटांची नैसर्गिक तटबंदी लाभल्यामुळे गडाला तटबंदी बांधलेली नसावी. तीन-साडेतीन तासांच्या भटकंतीने आपले गडदर्शन पूर्ण होते. गड उतरताना काळजीपूर्वक उतरावे लागते. ज्येष्ठ गिर्यारोहक आनंद शिंदे सोबत असल्यामुळे त्यांनी सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली. हरिहर आपल्या वैशिष्टय़पूर्ण रचनेने आकर्षक किल्ला असल्यामुळे त्यावर नेहमीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. प्रत्येकाने आपला जीव सांभाळून हा किल्ला पाहिल्यास यासारखा दुसरा आनंद नाही.

  • संजय तळेकर, (चारकोप अॅडव्हेंचर क्लब, कांदिवली)