
येथील विश्रामबाग रेल्वेगेटजवळ पादचारी भुयारी मार्गाऐवजी दुचाकी व चारचाकी भुयारी मार्ग करणे आवश्यक आहे. हा भुयारी मार्ग न झाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून, प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी; अन्यथा जनहित याचिका दाखल करून ‘रेल रोको’ आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला.
यावेळी रेल्वेगेट संघर्ष कृती समितीच्या वतीने पुणे विभागाच्या सेंट्रल रेल्वे विभागाच्या मंडल रेल प्रबंधकांना मागणीचे निवेदन पाठविण्यात आले. रेल्वेगेट संघर्ष कृती समितीच्या वतीने विश्रामबाग रेल्वेगेट नं. 130समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला माजी आमदार प्रा. शरद पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज आदी नेत्यांनी पाठिंबा दिला.
विश्रामबाग रेल्वेगेटजवळ सध्या भुयारी पादचारी मार्गाचे काम रेल्वे प्रशासन मंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू आहे. मात्र, या ठिकाणी भुयारी दुचाकी-चारचाकींसाठी मार्ग करणे आवश्यक आहे. या गेटजवळ पोलीस लाइन, विद्याविहार कॉलनी, विद्यानगर, वारणाली, झेडपी कॉलनी, अष्टविनायकनगर, जिजामाता कॉलनी, किर्लोस्कर कॉलनी, माळी कॉलनी, जयहिंद कॉलनी, ट्रफिक पोलीस ऑफिस, पोलीस मुख्यालय आदी परिसरातील सुमारे हजारो नागरिक भुयारी पादचारी मार्गाच्या नियोजनामुळे अडचणीत येणार आहेत.
भुयारी पादचारी मार्गातून महिलांना रात्रीच्या वेळी जाणे धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांसाठी मार्ग होणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आराखडय़ामुळे यामार्गातून फक्त पायवाट ठेवली आहे. यामुळे सुमारे तीन किलोमीटरच्या उड्डाणपुलाच्या अंतरावरून नागरिकांना यावे लागणार आहे. प्रशासनाने भुयारी मार्ग हा सायकल, दुचाकी व चारचाकीसाठी करावा, अशी मागणी केली आहे. तोपर्यंत रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने सध्या सुरू केलेले काम बंद करावे, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
नगरसेवक संतोष पाटील, विष्णू माने, राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, सोनाली सागरे, रवींद्र खराडे, सचिन लाड, प्रसाद वळकुंडे, प्रदीप साळवी, अजित दुधाळ, रणजीत तावडे आदी सहभागी झाले होते.


























































