
राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईसह सर्व राज्यात उन्हाचा चटका जाणवत आहे. ठाण्यातील मुरबाडमध्ये सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या तापमानाने मंगळवारी ठाणे जिल्ह्यात नवा उच्चांक नोंदवला. जिल्ह्यातील मुरबाडमधील ४४ अंश सेल्सिअसपाठोपाठ धसई येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तापमानाच्या नोंदीनुसार मंगळवार हा वर्षांतील सर्वात उष्ण दिवस ठरल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईच्या किनारी भागात तापमान 37 अंशावर असले तरी समुद्रापासून आत शहरांमध्ये उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ दिसून आली. विदर्भ, मराठवाडय़ातील बीड आणि परभणी, तसेच मध्य महाराष्ट्रात जळगाव आणि सोलापूर येथे तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. पुणे शहरात 39.2 एवढे तापमान नोंदवण्यात आले. राज्यात 14 ठिकाणी कमाल तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेल्याचे दिसून आले.





























































