बार्शीत अवकाळीने उद्ध्वस्त झालेल्या द्राक्षबागेवर चालविली कुऱ्हाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा जबर फटका बसला असून, आर्थिक कणा मोडलेल्या शेतकऱ्याने वेळेत शासनाने मदत न केल्यास आत्महत्या करण्याची आर्त हाक दिली आहे. बार्शी तालुक्यातील पिंपरीतील बाळासाहेब साहेबराव वायकर या शेतकऱ्याच्या द्राक्षबागेचे अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे या शेतकऱ्याने द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवून ती जमीनदोस्त केली आहे. वायकर यांच्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांची अवस्था झाली असून, शासनाकडून अद्यापि मदत न मिळाल्याने तीक्र संताप व्यक्त केला जात आहे.

बार्शी तालुक्यातील पिंपरी येथे राहणारे बाळासाहेब साहेबराव वायकर हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी लाखो रुपये खर्च करून द्राक्ष बाग तयार केली होती. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात जिवापाड जपलेली आणि तोडणीला आलेली द्राक्षबाग पूर्णपणे गळून पडली. हाताशी आलेले द्राक्षपीक मातीमोल झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. संपूर्ण बाग पडली. त्यामुळे वायकर हे हतबल झाले आहेत. कर्ज काढून केलेली द्राक्षबाग व हाताशी आलेले द्राक्षपीक अवकाळीने हिरावून नेल्याने त्यांची मानसिकता बिघडली. अशातच शासनाने अवकाळीग्रस्तांना मदत जाहीर करूनही मदत न दिल्याने त्यांनी संपूर्ण द्राक्षबागच कुऱहाडीने तोडून टाकली.

शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्यावी; अन्यथा शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या करावी लागेल, असा इशारावजा टाहो त्यांनी फोडला आहे. पंचनामा व मदतीची प्रक्रिया अत्यंत चुकीची व दिरंगाईची असल्याने शेतकऱ्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.