
कुडाळ नगरपंचायत कार्यालयाचे प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीकोनातून कुडाळ शहरातील सुजाण नागरिकांकडून प्रशासनात सुधारणा होण्यासाठी न.पं.प्रशासनामार्फत सूचना मागविण्यात येत आहेत. नगरविकास दिनाच्या निमित्ताने न.पं. प्रशासनाकडून हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात येत आहे, अशी माहीती न.पं.च्या मुख्याधिकारी करिश्मा नायर यांनी दिली.
नगरपरिषद प्रशासन संचलनालय यांच्यामार्फत कुडाळ नगरपंचायत कार्यालय येथे गुरूवारी नगर विकास दिन साजरा करण्यात आला. नगरपरिषद प्रशासन संचलनालय अंतर्गत कोकण विभागीय सर्व नगरपंचायती, नगरपरिषदा यांच्या जिल्हा प्रशासन कार्यालयात नगर विकास दिन साजरा करण्याबाबत निर्देश जारी करण्यात होते. या दिनाचे औचित्य साधून कुडाळ नगरपंचायत प्रशासनाकडून अभिनव उपक्रम सुरु करण्यात येत आहे. नगरपंचायत कार्यालयाचे प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीकोनातून कुडाळ शहरातील सुजाण नागरिकांकडून प्रशासनात सुधारणा होण्यासाठी सूचना मागविण्यात येत आहेत. प्रशासनात पारदर्शकता निर्माण होण्यासाठी नागरिक व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्यात सुसंवाद निर्माण होणे आवश्यक आहे. या दृष्टीने वरील अभिनव उपक्रम कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून सुचविण्यात आला आहे. त्यानुसार कुडाळ नगरपंचायत कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत किंवा पत्राद्वारे तसेच [email protected] येथे मेल द्वारे नागरिकांकडून सूचना स्विकारण्यात येणार आहेत. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग दर्शवून आपल्या सूचना कार्यालयात द्यावयाच्या आहेत. नगरपंचायत अधिनियमाचे उल्लंघन न होता ज्या सूचनांची अंमलबजावणी करता येईल अशा सर्व सुचनांचा अभ्यास प्रशासनाकडून करण्यात येईल, अशी माहीती न.पं.च्या मुख्याधिकारी करिश्मा नायर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.






























































