
‘माझ्या विषयी अनेक बातम्या पसरवण्याचे काम केलं. पत्रकार जरा कुठ गेलं तर अजित पवार नॉट रिचेबल. बाकी लोक आहेत की… माझ्यामागे का आहेत बाबा? एखाद्याच्या मागे लागायचं म्हणजे किती हात धुवून लागायचं?’, असा सवाल करत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असं स्पष्टं केलं आहे. मात्र यावेळी बोलताना त्यांनी पहाटेच्या शपथविधीच्या प्रसंगाचा उल्लेख केला.
राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षांकडून प्रचार सुरू आहे. यामध्ये थेट पक्षाच्या नावाने निवडणुका लढवल्या जात नसल्या तरी पक्षांनी पुरस्कृत केलेल्या पॅनलद्वारे या निवडणुका लढवल्या जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रयत पॅनलच्या माध्यमातून जाहीर कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्तानं अजित पवार बोलत होते.
आपल्या बद्दल आलेल्या बातम्यांचा उल्लेख करत ते म्हणाले की, ‘मी असं का बोललो, असं विचारले जातं. मी जे येतं ते बोलतो. लोकांना असं वाटतं की 19 ला जसं सकाळी येऊन केलं, तसंच करतो की काय. पण मी आज तुम्हाला सांगतो की मी कायमच राष्ट्रवादीमध्ये राहणार आहे’, असा अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. ‘अजित पवार आणि बारामती असं एक नातं तयार झाले आहे. एक वेगळं समीकरण तयार झालं आहे. येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका’, असं आवाहन देखील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.
तमाशा बघायचा तो रात्री बघा!
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, काय कापाकापी करायची, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा’, अशा मिश्किल शब्दांमध्ये पक्षाच्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचं आवाहन केलं. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यात हशा ऐकायला मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रयत पॅनलच्या माध्यमातून जाहीर कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्तानं अजित पवार बोलत होते. त्यावेळी आपल्या भाषणा दरम्यान त्यांनी गौतमी पाटीलच्या तमाशाचा उल्लेख करत वातावरण हलकंफुलकं केलं.





























































