पुंछ दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा, स्थानिक व्यक्ती तीन महिन्यांपासून दहशतवाद्यांना पोसत होता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे 20 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दल प्रयत्न करत आहेत. पाच जवानांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर पुंछमधील भाटा धुरियनच्या जंगलांचे स्कॅनिंग करत आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी मेंढर भागातील एका व्यक्तीची ओळख पटवली आहे. त्याने दहशतवाद्यांना आश्रय दिला होता. नासिर अहमद असे आरोपीचे नाव असून तो मेंढरचा रहिवासी आहे. नासिरने दहशतवाद्यांना त्याच्या घरात सुमारे तीन महिने आसरा दिला तसेच त्यांना जेवणही दिले.

गेल्या आठवड्यात सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलेल्या 60 संशयितांपैकी नसीर हा एक होता. त्याने तपासादरम्यान कबूल केले की, त्याने दहशतवाद्यांना जवळपास तीन महिने आश्रय दिला होता व त्यांना रसद पुरवली होती. हल्ल्याच्या दिवशी त्याने त्यांना भिंबर गलीपर्यंत नेण्यासाठी वाहनाची व्यवस्थाही केली होती. हल्ल्याच्या ठिकाणापासून मेंढर येथील नसीर अहमद याचे घर जेमतेम 35 किमी अंतरावर आहे. हल्ल्यादरम्यान, हल्लेखोर पाकिस्तानमधील त्याच्या संपर्कात असलेल्या स्थानिक हँडलरकडून व्हॉईस नोट्सद्वारे सूचना प्राप्त करत होते, असे सूत्रांनी सांगितले.