
भिंगार कॅण्टोन्मेंट बोर्ड नगर महापालिकेत समावेशित करण्यासाठी शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाने महापालिकेला पत्र पाठवून अहवाल मागविला होता. त्यानुसार महापालिकेने शासनाला अहवाल दिला आहे. दरम्यान, भिंगारचा महापालिकेत समावेश करावा की नाही याबाबत मनपाच्या सर्वसाधारण सभेत विषय चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे.
देशातील सुमारे 62 कॅण्टोन्मेंट बोर्ड जवळच्या महापालिकेत समावेशित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातील काही कॅण्टोन्मेंट बोर्ड केंद्र सरकारने थेट हस्तक्षेप करीत महापालिकेत समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कॅण्टोन्मेंट बोर्ड लष्करी तळाच्या अखत्यारित येत असल्याने विकासाला खीळ बसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून स्थानिक नागरिक कॅण्टोन्मेंट बोर्डाचा महापालिकेत समावेश करण्याची मागणी करीत होते. नगर महापालिकेजवळ असणारा भिंगार कॅण्टोन्मेंट बोर्डही महापालिकेत समावेशित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह सर्वपक्षीय नेत्यांची आहे. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलन, निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे.
दरम्यान, राज्यस्तरावरून कॅण्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समावेश करण्याबाबत पत्र आले होते. त्यात कॅण्टोन्मेंट बोर्ड लोकसंख्या, क्षेत्रफळ अशा बाबींची विचारणा झाली होती. त्यानुसार आता महापालिका प्रशासनाने राज्य सरकारला अहवाल पाठविला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार भिंगार महापालिकेत समावेशित करण्यासाठी सर्वसाधारण सभेचा ठराव आवश्यक आहे. त्यानुसार प्रशासन सर्वसाधारण सभेत ठराव ठेवणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये भिंगार महापालिकेत समावेशित करण्याबाबत हालचाली होण्याची शक्यता आहे.
भिंगार कॅण्टोन्मेंट बोर्डाचा महापालिकेत समावेश करण्याबाबत अहवाल पाठविला आहे. हा विषय सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवला जाणार आहे.
– डॉ. पंकज जावळे, आयुक्त, नगर मनपा.






























































