एलन मस्क यांनी ट्विटरचे सीईओपद सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून अनेक धाडसी निर्णय घेतल्यामुळे चर्चेत आले होते. यात कंपनीचे मोठे नुकसानदेखील झाले होते. अखेर मस्क यांनी ट्विटरच्या सीईओपदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या सीईओपदी आता एका महिलेची नियुक्ती करण्यात येणार असून नवीन सीईओ पुढील सहा आठवडय़ांत कंपनीत रुजू होतील, अशी घोषणा एलन मस्क यांनी गुरुवारी केली आहे.

ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून यापुढे ते काम पाहतील. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीईओ पद सोडायचे का? असा सवाल मस्क यांनी एका सर्वेक्षणाद्वारे लोकांना विचारला होता. त्यावर 57.5 टक्के लोकांनी त्यांना पद सोडण्याचा सल्ला दिला होता. मला या कामासाठी योग्य व्यक्ती मिळाल्यास मी राजीनामा देईन, असे मस्क यांनी म्हटले होते. ट्विटरच्या नव्या महिला सीईओ कोण असणार हे मस्क यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र सीईओ पदाच्या शर्यतीत एनबीसी युनिव्हर्सलच्या प्रमुख लिंडा याकारिनो यांचे नाव चर्चेत आहे.