राहुरी बाजारपेठेत बंदोबस्तात अतिक्रमणांवर हातोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेच्या रस्त्याला अडथळा ठरणारी अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्याची मोहीम सुरू झाल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, सांडपाण्याच्या गटारीवरील पक्की अतिक्रमणे तसेच रहदारीच्या मार्गावरील अतिक्रमणे काढताना काही व्यापाऱयांना दिलेली सूट ही वादाला तोंड फोडणारी ठरली.

तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या राहुरी शहरात रस्त्याला अडथळा ठरणारी कच्च्या व पक्क्या स्वरूपाची अतिक्रमणे हा चिंतेचा विषय ठरला आहे. यापूर्वी अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, अवघ्या दोन दिवसांत ‘जैसे थे’ परिस्थिती झाल्याने ही कारवाई निव्वळ ‘फार्स’ ठरली होती.

तीन दिवसांपूर्वी रस्त्याकडेला भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या शेतकऱयांना हुसकावून लावण्यात आल्याने नगर परिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे झाले होते. या घटनेनंतर रस्त्याला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्याबाबत नगर परिषदेने व्यावसायिकांना कळविले होते. मात्र, नगर परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्याने आज सकाळपासून दोन जेसीबीच्या मदतीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत नगर परिषदेचे 20 कर्मचारी सहभागी झाले होते. राहुरी ग्रामीण रुग्णालय, भागिरथीबाई कन्या शाळा, नगर परिषद अग्निशमन केंद्र ते पाण्याची टाकी रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पक्की अतिक्रमणे करण्यात आली आहे. मात्र, ही अतिक्रमणे हटविण्याबाबत प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱयांकडून आजवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. आज पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात झाली. आडवी पेठेतील टपऱया काढल्यामुळे या मार्गावरील रस्ते मोकळे होऊन वाहतूक सुरळीत सुरू झाली. राहुरीच्या शनी मंदिराभोवती टपऱयांची अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने जागेवर तोडण्यात आली. बाजारपेठ ते छत्रपती शिवाजी चौक या मार्गावरील सांडपाण्याच्या गटारीवरील तसेच दुकानाच्या दर्शनी भागातील शेड जमीनदोस्त करण्यात आली. शिवाजी चौक ते शुक्लेश्वर मंदिर चौक या मार्गावर गटारीवर झालेले अतिक्रमण तोडण्यात आल्याने दुकानदार व नगर परिषद कर्मचाऱयांमध्ये वाद झाला. शुक्लेश्वर चौक ते नवी पेठ मार्गावरील अतिक्रमणे हटविताना ठरावीक व्यावसायिकांना सूट दिल्यामुळे वाद निर्माण झाला होता.